शिर्डी | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी कठोर भूमिका घेत कारवाईचा धडाका सुरू केला असताना, शिर्डी परिसरातील रात्रीच्या कथित वाळू वाहतुकीबाबत ‘दैनिक साईदर्शन’ने वृत्त प्रसिद्ध करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप आणि उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
शिर्डी परिसरात रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या कथित वाळू वाहतुकीला काही पोलिसांकडूनच अभय मिळत असल्याची चर्चा यापूर्वीपासून सुरू आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी वृत्त प्रसिद्ध होऊनही कारवाई न झाल्याने ‘नेमके या वाळूच्या धंद्याला कोणाचे पाठबळ आहे?’ असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांनंतरही स्थानिक पातळीवर कारवाई होत नसेल, तर आदेश झुगारणारे हात कोणाचे आहेत, याचा शोध घेणे आवश्यक आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना कथितपणे मोकळीक दिली जात असेल, तर त्यामागे कोणाचे हितसंबंध आहेत? कोणाच्या सांगण्यावरून ही वाहने रात्रीच्या वेळी बिनधास्त फिरतात? संबंधित पोलिसांचा अवैध वाळू वाहतुकीशी काही संबंध आहे का? या प्रश्नांची उत्तरे आता पोलीस प्रशासनाने जनतेसमोर आणणे गरजेचे आहे.
नागरिकांकडून आता थेट चौकशीची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची केवळ कागदोपत्री चौकशी न करता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित पोलिसांचे ड्युटी रेकॉर्ड, रात्रीच्या गस्तीचे रेकॉर्ड, अधिकृत वाहनांचे GPS रेकॉर्ड तसेच कायदेशीर प्रक्रियेत उपलब्ध असलेले मोबाईल लोकेशन व कॉल डिटेल्स तपासल्यास रात्रीच्या वाळू वाहतुकीच्या कथित नेटवर्कचे धागेदोरे स्पष्ट होऊ शकतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
कॉल रेकॉर्डिंगबाबत मात्र कायदेशीर प्रक्रिया आणि आवश्यक परवानग्यांचे पालन करूनच तपास करण्यात यावा, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
‘सुदर्शन चक्र’ आता शिर्डीत फिरणार का?
अहिल्यानगर जिल्ह्यात गुटखा, दारू, अमली पदार्थ, वाळू तस्करी यांसह विविध अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रयत्नशील असताना, स्थानिक पातळीवरील कथित दुर्लक्षामुळे संपूर्ण मोहिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
जिल्ह्याची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी कठोर भूमिका घेत असतील, तर त्यांच्या मोहिमेला स्थानिक पातळीवर कोणीतरी सुरुंग लावत आहे का, याचीही तपासणी झाली पाहिजे. ‘वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई का होत नाही?’ या प्रश्नापेक्षा आता ‘कारवाई रोखणारे कोण?’ हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालावे
शिर्डीतील कथित वाळू तस्करीबाबत ‘दैनिक साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई झाली नसेल, तर या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. पोलीस अधीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत संबंधित पोलिसांची भूमिका, त्यांच्या हालचाली, ड्युटी रेकॉर्ड आणि उपलब्ध तांत्रिक पुरावे तपासून वस्तुस्थिती समोर आणावी.
आरोप खरे असतील तर संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी आणि आरोप निराधार असतील तर त्याचेही स्पष्टीकरण जनतेसमोर यावे. मात्र ‘वाळू तस्करीला कोणाचे पाठबळ?’ हा प्रश्न अनुत्तरित ठेवून चालणार नाही.
नागरिकांचा थेट सवाल — वाळू तस्करी करणाऱ्यांवर कारवाई होत नाही, की कारवाई होऊ नये यासाठी कोणाचे ‘आशीर्वाद’ आहेत?
डस्टर गाडीचा रात्रीचा ‘खेळ’?
शिर्डी परिसरातील कथित वाळू वाहतुकीदरम्यान रात्रीच्या वेळी डस्टर गाडीच्या हालचालींबाबत नागरिकांमध्ये संशयाची चर्चा सुरू आहे. या गाडीतून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना कथितपणे लोकेशन दिले जाते का? संबंधित गाडी नेमकी कोणाची? रात्री ती कुठे-कुठे फिरते? कोणाच्या संपर्कात असते? याची चौकशी झाली तर वाळू वाहतुकीच्या कथित नेटवर्कचे धागेदोरे हाती लागतील का?
डस्टर गाडीचे CCTV फुटेज, वाहनाचे GPS/उपलब्ध तांत्रिक पुरावे आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार उपलब्ध कॉल डिटेल्स तपासले, तर ‘रात्रीचा हा खेळ’ नेमका कोणाचा आहे, याचा उलगडा होऊ शकतो.
साईदर्शनचा सवाल — डस्टर गाडी फक्त फिरतेय, की वाळू तस्करीच्या वाहनांना ‘रस्ता मोकळा’ करून देण्याचे काम करतेय?