
शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात होणाऱ्या सायंकाळच्या आरतीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सूर्यास्ताच्या वेळेनुसार आरतीची वेळ निश्चित करण्यात आली असून दि. १० सप्टेंबर २०२६ पासून सायंकाळी ६.३० वाजता आरती सुरू होणार आहे.
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज हजारो भाविक शिर्डीत दाखल होत असतात. साईबाबांच्या समाधी मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. त्यामध्ये सायंकाळची आरती हा भाविकांसाठी विशेष भक्तिमय क्षण मानला जातो.
सूर्यास्ताच्या वेळेत ऋतूनुसार होणाऱ्या बदलाचा विचार करून संस्थानकडून सायंकाळच्या आरतीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार १० सप्टेंबरपासून सायंकाळी ६.३० वाजता आरतीला सुरुवात होईल. त्यामुळे सायंकाळच्या आरतीसाठी येणाऱ्या साईभक्तांनी नवीन वेळेची नोंद घेऊन त्यानुसार दर्शन व आरतीचे नियोजन करावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
आरतीच्या वेळी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असल्याने भाविकांनी संस्थानच्या सूचना, सुरक्षा नियम आणि दर्शन व्यवस्थेचे पालन करावे. आरतीसाठी वेळेत मंदिर परिसरात पोहोचून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
श्री साईबाबा संस्थानच्या मंदिर विभागाचे अधीक्षक विष्णुपंत थोरात यांनी याबाबतची माहिती दिली.


