
शिर्डी, दि. _ :
श्री साईबाबा संस्थानच्या विविध सेवाभावी उपक्रमांसाठी साईभक्त, उद्योग समूह, बँका तसेच सामाजिक संस्था सातत्याने मोलाचे सहकार्य करत असतात. याच परंपरेत आज युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या CSR निधीतून श्री साईबाबा संस्थानच्या दोन्ही रुग्णालयांसाठी एकूण ₹१ कोटी ९३ लाख किमतीची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आली आहेत.

या देणगीत २ नग अत्याधुनिक 3D नेफ्रोस्कोपी यंत्रणा व 2D कॅमेरा प्रणाली यांचा समावेश असून, या यंत्रसामग्रीचा उपयोग संस्थानच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहे. या आधुनिक उपकरणांमुळे रुग्णांच्या आजारांचे अचूक, वेगवान व प्रभावी निदान करण्यास मोठी मदत होणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी दिली.
या प्रसंगी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने युनियन बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पांडे यांचा सत्कार करण्यात आला. बँकेच्या या सामाजिक बांधिलकीचे संस्थान प्रशासनाने विशेष कौतुक केले.
अशा प्रकारच्या देणग्यांमुळे श्री साईबाबा संस्थानच्या रुग्णसेवा व इतर सेवाभावी उपक्रमांना अधिक गती मिळत असून, साईभक्त व गरजू रुग्णांना दर्जेदार व अद्ययावत वैद्यकीय सेवा देणे अधिक प्रभावीपणे शक्य होत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

