
शिर्डी येथे निमगाव शिवारातील देशमुख चारी लगत राहणा-या गोरगरीब जनतेची घरे काढल्याने तेथील कुटुंबाचे संसार उघड्यावर आले असुन त्यांचे डोक्यावरील छप्पर गेल्याने संतापाची भावना निर्माण झाली आहे. याबाबत आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेवुन या गरीब लोकांना शासकीय जागेत घरकुल बांधुन देवुन न्याय द्यावा अशी मागणी करणार आहोत. सदरहु ठिकाणी राहात्याच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा व भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी संबंधीत कुटुंबांना भेट देवुन त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.

यावेळी डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी बोलताना सांगितले की वास्तविक याठिकाणी आवश्यकता नसताना अतिक्रमणाच्या नावाखाली घरे काढण्यात आलेले असल्याचे प्रथम दर्शनी दिसुन येते. 400 हुन अधिक कुटुंब गेल्या 60-70 वर्षापासुन त्या ठिकाणी वास्तव्यास होते. ते त्याठिकाणचे कायमचे रहिवाशी झालेले होते. काहीच्या दोन-दोन पिढ्या त्याठिकाणी गेल्या असल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले.
अतिक्रमण निघाले त्याठिकाणी जावुन माहिती घेतली असता तेथील रहिवासांचा इरिगेशनची चारी असेल,रस्ता असेल किंवा इतर कुठल्याही वाहतुकीस अडथळा होत नसताना कारवाई झाल्याचे समजले. नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा या भेटी साठी व आपले दुख जाणुन घेण्यासाठी आलेल्या पाहुन तेथील महिलांचा अश्रुंचा बांध फुटला व सौ.ममता पिपाड़ा पिपाडा यांच्या गळ्यात पडुन आपल्या दुख:द भावना व्यक्त केल्या.
तेथील महिलांच्या यातना व घरे भुईसपाट केलेले दृष्य पाहुन काळीज हेलावुन गेले. तेथील प्रत्येक कुटुंबाची एक वेगळीच व्यथा होती. कोणाच्या घरी दोन दिवसाची बाळंतीन महिला होती तर कोणाच्या घरात आजारपणाने खाटावर झोपलेले वृद्ध होते. अशातच बुलडोजर येईल व आपली घरे उद्धवस्त करुन जाईल असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. तेथील प्रत्येक कुटुंब हे शासनाला घरपट्टी ,पाणीपट्टी,लाईटबील असे कर भरत होते,
प्रत्येक घराला मिळकत नंबर होता. काहींनी शासकीय योजनेचा लाभ घेवुन घरे बांधली होती. साईबांच्या शिर्डीत जावुन दोन वेळची भाकरीची व्यवस्था होईल यासाठी मेहनत करायचे. घरे पडलेली असतानाही उघड्यावर चार भांड्यांचा संसार मांडुन पोटाची खळगी भरण्यासाठी भर उन्हात स्वयंपाक करत असलेली महिलेच्या डोळ्यात अश्रुंचे थैमान सुरु होते. आज या विस्थापित झालेल्या कुटुंबांना कोणी वाली राहीलेला नाही अशी अवस्था झाली आहे.
पुढे बोलताना डॉ.राजेंद्र पिपाडा म्हणाले की या सर्व बेघर झालेल्या कुटुंबांच्या व्यथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेवुन या गरीब लोकांना शासकीय जागेत घरकुल बांधुन देवुन न्याय द्यावा अशी मागणी करणार आहोत.