श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्रीरामपूर शहर व परिसरातील वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच चोरीची वाहने बेकायदेशीरपणे भंगारात विकली जात असल्याच्या संशयाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना वाहने तोडून त्यांचा स्क्रॅप करणाऱ्या दोन भंगार दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशानुसार दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत ऑल आऊट ऑपरेशन, विशेष मोहीम व कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. यावेळी शहरातील विविध भंगार दुकानांची बारकाईने झडती घेऊन वाहनांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील कागदपत्रे व नोंदींची सखोल तपासणी करण्यात आली.
या तपासणीदरम्यान तीन भंगार दुकानदारांकडून संशयास्पद वाहनांबाबत माहिती घेण्यात आली. पोलिसांनी संबंधितांना नोटिसा बजावून वाहनांची खरेदी-विक्री, मालकी हक्क व उपलब्ध कागदपत्रांबाबत खुलासा मागविला. त्यापैकी आसिफ हारुण शहा यांचा खुलासा समाधानकारक आढळून आला. मात्र शकील इब्राहीम शहा आणि सुलेमान दादामिया शहा यांच्या ताब्यातील वाहनांबाबत मालकी हक्क सिद्ध करणारे आवश्यक पुरावे उपलब्ध झाले नाहीत.
तपासात संबंधित वाहनांच्या मालकीबाबत समाधानकारक पुरावे नसल्याचे तसेच वाहने स्क्रॅप करण्यापूर्वी उपप्रादेशिक परिवहन विभागाची आवश्यक परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. वाहनांचे चेसिस व इंजिन क्रमांक संबंधित विभागाकडे जमा न करता तसेच शासनाचा कर न भरता नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ८८७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, ३१८(४) व ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शकील इब्राहीम शहा (वय ४९, रा. पाण्याच्या टाकीजवळ, वॉर्ड नं. २, श्रीरामपूर) आणि सुलेमान दादामिया शहा (वय ४५, रा. संजयनगर, वॉर्ड नं. २, श्रीरामपूर) यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
भंगार दुकानदार, गॅरेज चालकांनी नियमांचे पालन करावे
भंगार दुकानदारांनी दुकानात येणाऱ्या प्रत्येक जुन्या वाहनाची, इंजिन व चेसिस क्रमांकाची तसेच सुट्या भागांची अचूक नोंद रजिस्टरमध्ये ठेवावी. वाहन खरेदी करताना आरसी बुक, खरेदीखत व विक्रेत्याचे ओळखपत्र तपासल्याशिवाय व्यवहार करू नये. RTO ची अधिकृत परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही वाहन स्क्रॅप करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
विना नंबरचे, संशयास्पद अथवा अत्यंत कमी किमतीत विक्रीस आणलेले वाहन आढळल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. नागरिकांनीही जुनी वाहने खरेदी करताना चेसिस नंबर, इंजिन नंबर आणि मालकी हक्काची कागदपत्रे काळजीपूर्वक तपासावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल खैरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ, पोलीस उपनिरीक्षक उमेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे तसेच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी ही कारवाई केली.