शिर्डी | प्रतिनिधी :
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून शिर्डीत दाखल होणाऱ्या लाखो भाविकांना स्वच्छ, दर्जेदार आणि शिस्तबद्ध पद्धतीने प्रसाद भोजन उपलब्ध करून देणाऱ्या श्री साईप्रसादालयाच्या सुविधांमध्ये आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आणखी एक भर पडली आहे. भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) वतीने श्री साईप्रसादालयासाठी तब्बल ६९ लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देणगी स्वरूपात देण्यात आले आहे.
जर्मनीतील Winterhalter (विंटरहॅल्टर) या नामांकित कंपनीचे हे अत्याधुनिक मशीन मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या डिश स्वच्छतेच्या प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे, या मशीनची ताशी तब्बल ३ हजार डिश स्वच्छ करण्याची क्षमता आहे. त्यामुळे प्रसादालयात दररोज मोठ्या संख्येने भाविकांसाठी भोजन व्यवस्था करताना डिश धुण्याच्या प्रक्रियेला वेग, अचूकता आणि स्वच्छतेची नवी जोड मिळणार आहे.

वेगवान स्वच्छता प्रक्रियेमुळे मनुष्यबळावरील ताणही कमी
श्री साईप्रसादालयात देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच विदेशातून येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या डिशची स्वच्छता हा भोजन व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. नवीन अत्याधुनिक मशीनमुळे कमी वेळेत मोठ्या संख्येने डिश स्वच्छ करण्यास मदत होणार असून, स्वच्छता आणि कार्यक्षमतेचा दर्जा आणखी उंचावणार आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे डिश स्वच्छतेची प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण होण्यास मदत होणार असून, प्रसादालयातील संपूर्ण भोजन व्यवस्थेला त्याचा थेट फायदा होणार आहे.
सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते विधिवत पूजन
या अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीनचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
यावेळी एसबीआई शाखेचे शाखा अधिकारी सचिन खळेकर
महेश हांडगे रमेश गोडगे तसेच श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ, श्री साईप्रसादालयाचे प्रमुख संजय शिंदे, लाडू निर्मिती विभाग प्रमुख रवींद्र गायके यांच्यासह श्री साईप्रसादालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
भाविकांच्या सेवेसाठी आधुनिकतेची जोड
श्री साईप्रसादालयाच्या माध्यमातून भाविकांना प्रसाद भोजनाची सेवा देताना स्वच्छता, गुणवत्ता आणि कार्यक्षमतेला विशेष महत्त्व दिले जाते. भारतीय स्टेट बँकेने दिलेल्या या ६९ लाख रुपयांच्या अत्याधुनिक मशीनमुळे ‘भाविक सेवा’ या केंद्रस्थानी ठेवलेल्या प्रसादालयाच्या व्यवस्थेला आधुनिक तंत्रज्ञानाची भक्कम साथ मिळाली आहे.
ताशी तीन हजार डिश स्वच्छ करण्याची क्षमता असलेले हे मशीन मोठ्या प्रमाणातील भोजन व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, श्री साईप्रसादालयाच्या कार्यक्षमतेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.