
शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो साईभक्त शिर्डीत येत असतात. गर्दी, गडबड किंवा कधी अनावधानाने अनेकांचे मोबाईल हरवण्याच्या घटना घडतात. मोबाईलची किंमत हजारो रुपयांत असली तरी थोड्याशा निष्काळजीपणामुळे भक्तांना मोठा आर्थिक फटका बसतो. मात्र केंद्र सरकारच्या दूरसंचार ‘साथी’ पोर्टलच्या मदतीने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिसांनी हरवलेले मोबाईल शोधून देण्याचे कौतुकास्पद काम केले आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हरवलेल्या मोबाईलचा माग काढला. भारतातील विविध राज्यांत पोहोचलेल्या मोबाईलचा शोध घेत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांमुळे गेल्या वर्षभरात १७३ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत मिळवून देण्यात आले, अशी माहिती पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली.
यातील एक उदाहरण म्हणजे शिर्डी शहरातील हॉटेल साई गीताचे व्यवस्थापक संतोष गायकवाड यांचा काही दिवसांपूर्वी सुमारे दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हरवला होता. शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पोलीस कर्मचारी संदीप उदावंत तसेच तांत्रिक पथकाने तपास करून हा मोबाईल शोधून काढला आणि तो गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला.
मोबाईल परत मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना संतोष गायकवाड म्हणाले, “हरवलेला मोबाईल परत मिळेल अशी अपेक्षा नव्हती. मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास करून तो शोधून दिला. त्यामुळे पोलीस खात्यावरील माझा विश्वास अधिक दृढ झाला आहे.”
शिर्डी पोलिसांच्या या उपक्रमामुळे हरवलेले मोबाईल परत मिळण्याची शक्यता वाढली असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
नागरिकांनी मोबाईलची काळजी घ्यावी
— पोलीस उपनिरीक्षक सागर काळे
हरवलेले मोबाईल केंद्र सरकारच्या दूरसंचार ‘साथी’ प्रणालीच्या मदतीने तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शिर्डी पोलिसांनी शोधून काढून संबंधित मालकांना परत दिले आहेत. मात्र अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनीही स्वतःच्या मोबाईलची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांनी केले. गर्दीच्या ठिकाणी मोबाईल सुरक्षित ठेवणे, अनोळखी व्यक्तीकडे देऊ नये तसेच मोबाईल हरवल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी सांगितले.
