शिर्डी : साईबाबांच्या पवित्र मंदिर परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाच दमदाटी करून कारवाई थांबविण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याप्रकरणी माजी मंदिर प्रमुख तसेच सोसायटीचे चेअरमन राहिलेल्या रामराव रंभाजी शेळके यांच्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईने शिर्डीच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
कर्तव्यावरच्या कर्मचाऱ्याला धमकी; “तू मूर्ख आहेस, तुला बघून घेतो!”
फिर्यादीतील आरोपानुसार, मारुती मंदिर परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई सुरू असताना रामराव शेळके यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद घालत महिलांना रस्त्यावर फुले व हार विक्री करू द्यावी, अशी मागणी केली.
मात्र, साईभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी आणि मंदिर परिसरातील अनधिकृत विक्री रोखण्यासाठी कारवाई सुरू असल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा सल्लाही देण्यात आला. मात्र, फिर्यादीच्या म्हणण्यानुसार संबंधितांनी हा सल्ला धुडकावून लावत कर्मचाऱ्यांनाच धमकावल्याचा आरोप आहे.
“तू मूर्ख आहेस… मी तुला बघून घेतो,” अशी धमकी देत अरेरावी आणि अश्लील शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
फेरीवाल्यांच्या बाजूने उभे राहण्याचा अधिकार कुणी दिला?
मंदिर परिसरात अनधिकृत फेरीवाले हटविण्यासाठी संस्थान आणि नगरपालिकेचे कर्मचारी संयुक्तपणे कारवाई करीत असताना या कारवाईत हस्तक्षेप का करण्यात आला? अनधिकृत विक्रेत्यांना पाठिंबा देण्यामागे नेमके काय कारण आहे? कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याला धमकावण्याइतकी आक्रमक भूमिका का घेण्यात आली?
या सर्व प्रश्नांची चर्चा आता शिर्डीकरांमध्ये सुरू झाली आहे.
कारवाई करायची जबाबदारी प्रशासनाची असताना एखाद्या व्यक्तीने घटनास्थळी जाऊन दबाव निर्माण करणे आणि सरकारी अथवा संस्थानच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याचे आरोप होणे, हा प्रकार गंभीर असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
माजी मंदिर प्रमुखांवरच गुन्हा; प्रतिष्ठेच्या पडद्यामागे दबावाचे राजकारण?
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गुन्हा दाखल झालेले रामराव शेळके हे यापूर्वी मंदिर प्रमुख म्हणून कार्यरत होते तसेच एका सोसायटीचे चेअरमनपदही त्यांनी भूषविले आहे.
मात्र, माजी पदाचा रुबाब दाखवून कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला का? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
साईबाबांच्या मंदिर परिसरात लाखो भाविक येत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतुकीतील अडथळे टाळण्यासाठी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. अशा कारवाईला विरोध करून कर्मचाऱ्यांनाच धमकी देण्यात आल्याचा आरोप हा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून, प्रशासनाच्या अधिकारालाच आव्हान देण्याचा प्रकार तर नाही ना? अशीही चर्चा सुरू झाली आहे.
‘मी तुला बघून घेतो’ म्हणणाऱ्यांना आता कायदा दाखवणार आपली ताकद?
कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याला धमकावून कारवाई थांबविण्याचा प्रयत्न झाल्याच्या आरोपावरून अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.