शिर्डी | प्रतिनिधी
साईबाबांच्या पावन भूमीत आजही प्रामाणिकपणा आणि माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय देणारी घटना समोर आली आहे. श्री साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील कर्मचारी मारुती शिवराम कांदळकर यांना मंदिर परिसरातील गेट क्रमांक १ जवळ सोन्याची अंगठी सापडली. अंगठी सापडल्यानंतर तिच्या किंमतीचा कोणताही मोह न ठेवता कांदळकर यांनी ती तातडीने संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा केली.
सदर सोन्याच्या अंगठीचे वजन ३.३९० ग्रॅम असून तिची अंदाजे किंमत ४५ हजार रुपये आहे.
मंदिर परिसरात भाविकांच्या गर्दीत सापडलेली मौल्यवान वस्तू स्वतःकडे न ठेवता ती संस्थानकडे जमा करून कांदळकर यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेचे आणि प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले.
श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गोरक्ष गाडीलकर तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. भीमराज दराडे यांनी मारुती शिवराम कांदळकर यांच्या प्रामाणिकपणाचे व कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
“साईबाबांच्या दरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाची किंमत मोठी!” असा संदेश देणारी ही घटना शिर्डीच्या सेवाभावी संस्कृतीचे दर्शन घडविणारी ठरली आहे.