
आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डी शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता सुळसुळाट आता गंभीर स्वरूप धारण करत असून, याचा फटका थेट साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांनाही बसू लागला आहे. मंगळवारी सकाळी कर्तव्यावर जात असताना संस्थानचे कर्मचारी मिनीनाथ आग्रे यांच्यावर मोकाट कुत्र्यांच्या कळपाने हल्ला करून गंभीर जखमी केले. या घटनेमुळे भाविक, नागरिक आणि संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिनीनाथ आग्रे हे सकाळी सुमारे ७ वाजता साई उद्यान येथील गेट क्रमांक २ जवळून ड्युटीसाठी जात असताना अचानक मोकाट कुत्र्यांच्या कळपाने त्यांच्यावर झडप घातली. एका कुत्र्याने त्यांच्या पायाच्या पोटरीचा जोरदार चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ साईनाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा दुर्लक्षित; आता प्रशासन जबाबदार?
विशेष म्हणजे, याच समस्येबाबत गेल्या आठवड्यात सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ कोते यांनी श्री साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगर परिषदेला लेखी निवेदन देऊन मंदिर परिसरातील मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हरिभाऊ कोते यांनी सांगितले की, “आजही मंदिर परिसरात आणि मंदिराच्या आवारात मोकाट कुत्रे मुक्तपणे फिरताना दिसतात. दर्शनासाठी येणारे साईभक्त त्यांना पाहून घाबरून जात आहेत. जर एखाद्या भाविकाला किंवा नागरिकाला गंभीर इजा झाली तर त्यास सर्वस्वी नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील.”
लाखो भाविकांच्या सुरक्षेशी खेळ सुरू?
शिर्डीत दररोज देश-विदेशातून हजारो-लाखो साईभक्त दर्शनासाठी येतात. मंदिर परिसर, साई उद्यान, मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत आहेत. अनेकदा भाविक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना या कुत्र्यांच्या भीतीमुळे त्रास सहन करावा लागत आहे.
न्यायालयानेही मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असतानाही शिर्डी नगर परिषद प्रशासन या प्रश्नावर ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप होत आहे.
“मोठी दुर्घटना झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?”
संस्थानच्या कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “एखाद्या साईभक्ताचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. शिर्डी नगर परिषद, संबंधित आरोग्य विभाग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
साईनगरीतील भाविकांच्या सुरक्षेपेक्षा प्रशासनासाठी दुसरे कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत? असा सवाल आता नागरिकांकडून थेट विचारला जात असून, मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर तातडीची कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

