
दैनिक पुण्यनगरी परिवाराच्या वतीने श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या पावन भूमीत, शिर्डी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये अत्यंत दिमाखदार वातावरणात पार पडलेल्या “हीरोज ऑफ अहिल्यानगर 2026” या भव्य पुरस्कार सोहळ्यात राहाता प्रेस क्लबचे सचिव, अभ्यासू आणि निर्भीड पत्रकार दिलीपराव खरात यांना “पुण्यनगरी स्टार रिपोर्टर 2026” या विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा बहुमान राज्याचे कर्तव्यदक्ष अप्पर पोलीस महासंचालक आयपीएस कृष्णप्रकाश तसेच भारत सरकारकडून सन्मानित बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदान, शोध पत्रकारितेतील धाडसी कामगिरी आणि समाजहितासाठी केलेल्या परखड लेखनाची ही मोठी दखल मानली जात आहे.
दिलीप खरात हे नाव आज अहिल्यानगर जिल्ह्यात निर्भीड, तडफदार आणि अभ्यासपूर्ण पत्रकारितेचे प्रतीक बनले आहे. कोणाच्याही दबावाला न जुमानता सत्य मांडण्याची त्यांची शैली सर्वसामान्य नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करणारी ठरली आहे. त्यांच्या लेखणीला केवळ धार नाही, तर अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे सामर्थ्यही आहे. सत्ताधारी असो वा प्रभावशाली व्यक्ती, चुकीच्या गोष्टींवर परखड भाष्य करण्याची त्यांची भूमिका कायम ठाम राहिली आहे.पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रामाणिकपणा जपत त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकला. सामान्य माणसाच्या वेदना, शेतकऱ्यांचे प्रश्न, प्रशासनातील त्रुटी आणि समाजातील वास्तव त्यांनी आपल्या बातम्यांमधून प्रभावीपणे मांडले. त्यामुळेच वाचकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदराची भावना निर्माण झाली आहे.
दिलीप खरात यांचा मनमिळाऊ स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आणि पत्रकारितेप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे, हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे.
यावेळी पुण्यनगरीचे संचालक भावेश शिंगोटे, वृत्तसंपादक विकास अंत्रे, व्यवस्थापक जीवन गवळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दिलीपराव खरात यांना मिळालेला हा सन्मान म्हणजे केवळ एका पत्रकाराचा गौरव नसून निर्भीड आणि जनतेच्या बाजूने उभी राहणाऱ्या पत्रकारितेचा विजय असल्याची भावना यावेळी उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.
साईबाबांच्या पावन शिर्डी नगरीत सामाजिक, सहकार आणि कामगार चळवळीतील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत दैनिक पुण्यनगरी परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “हिरोज ऑफ अहिल्यानगर 2026” या भव्य पुरस्कार सोहळ्यात श्री साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन मा. विठ्ठलराव पवार यांना मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
साईसंस्थानचा कर्मचारी ते कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या पतसंस्थेचे यशस्वी चेअरमन हा त्यांचा प्रेरणादायी प्रवास अनेकांसाठी आदर्श ठरत आहे. कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात येत आहे.
रविवार दि. 24 मे 2026 रोजी शिर्डी येथील हॉटेल सेंट लॉर्न येथे होणाऱ्या या दिमाखदार सोहळ्यात राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश तसेच बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
विठ्ठलराव पवार यांनी आपल्या नेतृत्वातून सहकार क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकी जपत संस्थेला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेले आहे. त्यामुळेच आज त्यांचे नाव शिर्डी परिसरात एक कर्तृत्ववान आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून घेतले जाते.
या विशेष सन्मानाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून दैनिक साई दर्शन परिवाराच्या वतीनेही त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत. 🌹💐

