
संगमनेर : प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यातच चैनस्नॅचिंगची थरारक घटना घडल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली होती. लग्नस्थळी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील तब्बल 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने क्षणार्धात लंपास केले. ऐन मंगलकार्यामध्ये घडलेल्या या घटनेमुळे उपस्थितांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 362/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील सराईत आरोपी सागर सुरेश कांबळे हा आपल्या साथीदारांसह चोरी केलेल्या सोन्याची वाटणी करण्यासाठी ममदापूर फाटा येथे येणार आहे. माहिती मिळताच LCB च्या पथकाने तात्काळ परिसरात सापळा रचला. काही वेळात संशयित मोटारसायकलवर येताच पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करत दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी आपली नावे सागर सुरेश कांबळे (वय 32, रा. रमानगर वार्ड नं.1, श्रीरामपूर) आणि बबलू उर्फ अब्दुल इब्राहिम पिंजारी (वय 36, रा. वार्ड नं.2, श्रीरामपूर) अशी सांगितली. पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्नातील चैनस्नॅचिंगची कबुली दिली. तसेच हा गुन्हा आतिक अयुब उर्फ आरिफ शेख आणि सनी विलास ढोकणे या साथीदारांसह केल्याचेही उघड झाले.
हे दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 49 हजार 500 रुपयांचे 11.5 ग्रॅम सोन्याचे दागिने, 70 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल आणि 70 हजार रुपयांची मोटारसायकल असा एकूण 2 लाख 89 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे संगमनेर परिसरात पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेची चर्चा रंगली आहे. लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम आणि गर्दीच्या ठिकाणी सक्रिय असलेल्या चैनस्नॅचर टोळ्यांवर पोलिसांनी आता विशेष लक्ष केंद्रीत केले असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात चैनस्नॅचिंग किंवा संशयित गुन्हेगारांबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्या 0241-2416111 या क्रमांकावर किंवा डायल 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

