३७ वर्षांची निःस्वार्थ सेवा पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब शिंदे यांचा सन्माननीय सेवानिवृत्ती सोहळा”
शिर्डी प्रतिनिधी – पोलिस उपनिरीक्षक श्री. रावसाहेब वेणूनाथ शिंदे यांनी तब्बल 37 वर्षांची निःस्वार्थ, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ सेवा पूर्ण करून दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती घेतली आहे. आपल्या सेवाकाळात त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील तोफखाना, श्रीरामपूर शहर, लोणी, राहाता, शिर्डी तसेच श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे अत्यंत प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम केले. त्यांनी केलेल्या सेवेमुळे पोलीस विभागात तसेच नागरिकांमध्ये त्यांची एक आदर्श, कठोर पण मानवतावादी अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली.

शिंदे यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला (भा.पो.से.) यांनी त्यांना विशेष सन्मानपत्र प्रदान केले. या सन्मानपत्रात त्यांच्या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी सेवेला आदरांजली वाहत त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदी, निरोगी आणि तणावमुक्त जावो, अशी शुभेच्छा देण्यात आली आहे.
रावसाहेब शिंदे यांच्या सेवाकाळात त्यांनी कायद्याची अंमलबजावणी करताना समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेले योगदान अविस्मरणीय ठरले आहे. त्यांच्या सेवाभाव, संयम आणि कर्तव्यनिष्ठ वृत्तीमुळे ते पोलीस दलातील सहकाऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. शिर्डी, राहाता आणि श्रीरामपूर परिसरातील नागरिकांनी देखील त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या पुढील आयुष्याला उत्तम आरोग्य व समाधान लाभो, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

