कोपरगाव | प्रतिनिधी
समाजाने आपल्याला दिले आहे, त्यातील काहीतरी समाजाला परत देण्याची भावना मनात ठेवून दानशूर पंकज लोढा यांनी सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. पीडित महिला व बालकांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या स्नेहालय संस्थेला त्यांनी ११ गुंठे जमीन देणगीस्वरूपात दिली आहे. या जागेवर स्नेहालयाचा सुसज्ज प्रकल्प उभारण्यात येणार असून, कोपरगाव परिसरातील गरजू, पीडित महिला आणि बालकांना या माध्यमातून आधार मिळणार आहे.
“स्नेहालय हे रंजल्या-गांजल्यांना आधार देणारे कार्य आहे. आई-वडिलांनी दिलेली शिकवण आणि साईभक्तीच्या प्रेरणेतून स्नेहालयाच्या कार्यासाठी योगदान देण्याची भावना मनात निर्माण झाली. दात्यांच्या सहकार्यातून येथे सुसज्ज प्रकल्प उभारण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन स्नेहालयचे विश्वस्त पंकज लोढा यांनी केले.

स्नेहालयाचे कार्य आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीश कुलकर्णी यांचे काम पाहून आपण प्रभावित झालो. समाजासाठी काहीतरी देणे लागतो, ही शिकवण आई-वडिलांनी दिली. त्यातूनच कोपरगाव येथे स्नेहालयाचा प्रकल्प सुरू व्हावा, या उद्देशाने जमीन देण्याचा निर्णय घेतल्याचे लोढा यांनी सांगितले.
जमीन सुपूर्त करण्याचा कार्यक्रम स्नेहालयचे पदाधिकारी आणि साई कुबेर ग्रुपच्या सदस्यांच्या उपस्थितीत पार पडला. आयुर्वेदाचार्य डॉ. रामदास आव्हाड, आरजेएस फाऊंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे, उद्योजक राजेश ठोळे व सतीश लोढा यांच्या हस्ते जागा सुपूर्त करण्यात आली.
यावेळी रवींद्र बोरावके, स्नेहालयाच्या विश्वस्त रूपाली मुनोत, सपना असावा, डॉ. प्रीती बोंबे, गीता कौर, प्रवीण मुठाळ आदी उपस्थित होते.
लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात
कोपरगाव येथे स्नेहालयाचा प्रकल्प उभा राहण्यासाठी साई कुबेर ग्रुपच्या माध्यमातूनही सहकार्य केले जाणार असून, लवकरच या जागेवर बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे. पीडित महिला आणि बालकांच्या पुनर्वसनासाठी उभा राहणारा हा प्रकल्प सामाजिक संवेदनशीलतेचे आणि सेवाभावाचे केंद्र ठरणार आहे.
जमीन देणगीच्या माध्यमातून पंकज लोढा यांनी केवळ जागा दिली नाही, तर अनेक गरजूंच्या आयुष्यात नव्याने आशेची जागा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.