शिर्डी/काशी, दि. १ : साई निर्माण ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेली बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘१२ ज्योतिर्लिंग संकल्पपूर्ती यात्रा’ ३१ ऑगस्ट रोजी पवित्र बनारस अर्थात काशी नगरीत मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात दाखल झाली. हजारो साईभक्तांच्या उपस्थितीत रंगलेल्या या अविस्मरणीय सोहळ्यामुळे काही काळासाठी जणू संपूर्ण काशी नगरी ‘साईमय’ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
भगवान श्री काशी विश्वनाथांच्या पवित्र नगरीत साई पालखीचे आगमन होताच भक्तांच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले. स्थानिक साईभक्त राजेश अरोरा तसेच इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते साई पालखीची अत्यंत विधिवत आणि भक्तिभावाने महाआरती करण्यात आली. मंत्रोच्चार, घंटानाद आणि साईनामाच्या गजरात झालेल्या या महाआरतीने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारून गेला.

महाआरतीनंतर सुरू झालेला भक्तीचा महासागर पाहण्यासारखा होता. ढोल-ताशांचा दणदणाट, बँड पथकाची सुरेल साथ आणि हजारो कंठातून निघणारा ‘ॐ साई नमो नमः, जय जय साई नमो नमः’ चा अखंड जयघोष यामुळे काशीच्या रस्त्यांवर एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले. त्याला ‘हर हर महादेव’च्या गगनभेदी घोषाची साथ मिळताच संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
यानंतर साई पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हजारो साईभक्त या पालखी सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या तालावर भक्तांचा आनंद ओसंडून वाहत होता. साईभक्तांच्या भक्ती, उत्साह आणि शिस्तीचे अनोखे दर्शन या शोभायात्रेत घडले.
भव्य शोभायात्रा पुढे श्री काशी विश्वनाथ मंदिराकडे मार्गस्थ झाली.
काशी विश्वनाथ कॉरिडॉरमध्ये साईभक्तांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. यात्रेत सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपले आराध्य दैवत श्री काशी विश्वनाथ यांचे दर्शन घेतले. एका बाजूला साईबाबांच्या नामाचा गजर तर दुसऱ्या बाजूला महादेवाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर अक्षरशः निनादून गेला.
शिर्डीच्या साईबाबांची भक्ती आणि काशीच्या विश्वनाथांचे अध्यात्म यांचा संगम घडवून आणणारा हा सोहळा केवळ एक धार्मिक यात्रा न राहता, श्रद्धा, भक्ती, संस्कृती आणि शिस्तीचा एक अद्वितीय संगम ठरला.
३१ ऑगस्टचा हा दिवस हजारो साईभक्तांसाठी अविस्मरणीय ठरला असून, काशीच्या पवित्र भूमीवर घुमलेला साईनामाचा जयघोष आणि ‘हर हर महादेव’चा निनाद बनारसवासी तसेच शिर्डीकरांच्या मनात कायमस्वरूपी कोरला जाईल, अशी भावना या यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांनी व्यक्त केली.
साईभक्त तुलसीरामजी भाई यांचे यात्रेकरूंना प्रेमळ भोजनसेवेचे योगदान
काशी येथे साई निर्माण ग्रुपच्या १२ ज्योतिर्लिंग संकल्पपूर्ती यात्रेचा भक्तिमय सोहळा सुरू असताना विजूभाऊंचे दिल्ली येथील मित्र तथा साईभक्त श्री तुलसीरामजी भाई हे खास साई पालखी व यात्रेतील सर्व साईभक्तांची भेट घेण्यासाठी काशी येथे आले होते.
यावेळी साईभक्त तुलसीरामजी भाई यांनी यात्रेतील सर्व भाविकांसाठी एक वेळच्या भोजनाची प्रेमपूर्वक व्यवस्था करून आपली साईसेवा अर्पण केली. त्यांच्या या उदात्त आणि सेवाभावी योगदानाबद्दल यात्रेच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
“सेवा हीच साईभक्ती” या भावनेतून त्यांनी केलेली ही भोजनसेवा निश्चितच सर्व यात्रेकरूंच्या मनाला स्पर्शून गेली.
मनःपूर्वक धन्यवाद, तुलसीरामजी भाई! आपल्या या प्रेमळ साईसेवेस साईचरणी कोटी कोटी प्रणाम!