अहिल्यानगर / हैदराबाद, दि. ३० : महाराष्ट्रात धडाडीचे आणि कर्तव्यनिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून IAS तुकाराम मुंडे यांच्या कार्यशैलीची नेहमीच चर्चा होत असते. नियमभंग करणाऱ्यांवर कोणतीही भीडभाड न ठेवता कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याची प्रशासनाला कशी वेगळी ओळख निर्माण करून देता येते, याचे उदाहरण म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख केला जातो. आता तेलंगणा राज्यातही महाराष्ट्राच्या मातीतून घडलेल्या एका धडाडीच्या IPS अधिकाऱ्याने आपल्या कर्तव्यनिष्ठ आणि आक्रमक कार्यशैलीने गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण केली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळगाव माळवी येथील मूळ रहिवासी असलेले IPS अधिकारी वैभव रघुनाथ गायकवाड (2018 बॅच) यांनी तेलंगणा कॅडरमध्ये विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आपल्या कार्यक्षमतेची वेगळी छाप निर्माण केली आहे. सध्या ते हैदराबाद शहरात DCP, Task Force म्हणून कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली संघटित गुन्हेगारी, राऊडीशीटर्स, अवैध धंदे, अमली पदार्थांची तस्करी आणि अन्नभेसळीविरोधात धडक मोहीम सुरू आहे.
अहिल्यानगर ते हैदराबाद… कर्तव्याचा दमदार प्रवास
अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळगाव माळवी या ग्रामीण भागातून भारतीय पोलीस सेवेत दाखल झालेल्या वैभव गायकवाड यांनी 2018 मध्ये IPS म्हणून सेवेला सुरुवात केली. तेलंगणा कॅडरमध्ये नियुक्तीनंतर नालगुंडा जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली.
त्यानंतर वरंगळ येथे Assistant Superintendent of Police म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. पुढे वरंगळमध्येच Additional DCP Administration तसेच Task Force यांसारख्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या.
यानंतर पेद्दापल्ली आणि नागरकर्नूल या दोन जिल्ह्यांमध्ये Superintendent of Police म्हणून काम करताना कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण, गंभीर गुन्ह्यांचा तपास आणि प्रतिबंधात्मक पोलिसिंगचा व्यापक अनुभव त्यांनी मिळविला.
डिसेंबर 2025 पासून ते हैदराबाद शहरात DCP, Task Force म्हणून कार्यरत आहेत.
Task Force म्हणजे गुन्हेगारांसाठी ‘रेड अलर्ट’!
हैदराबादसारख्या महानगरात Task Force ची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. संघटित गुन्हेगारी, गुंडागर्दी, राऊडीशीटर्स, अवैध धंदे आणि संवेदनशील स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे काम या विभागामार्फत केले जाते.
मोठ्या प्रमाणातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा शोध, आरोपींचा माग काढणे आणि संघटित टोळ्यांवर कारवाई करण्याबरोबरच गणपती, दुर्गाष्टमी, मिलाद-उन-नबी, मोहरम आणि बोनालूसारख्या मोठ्या धार्मिक व संवेदनशील कार्यक्रमांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही Task Force कडे असते.
या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारीत वैभव गायकवाड यांनी गुप्त माहिती, तांत्रिक तपास आणि प्रतिबंधात्मक पोलिसिंग यांचा प्रभावी वापर करून गुन्हेगारीविरोधात मोहीम तीव्र केली आहे.
अन्नभेसळखोरांविरोधात ‘H-FAST’चा दणका!
Task Force च्या जबाबदारीसोबतच वैभव गायकवाड हे Hyderabad City Narcotics Wing चे प्रभारी म्हणूनही काम पाहत आहेत. याचबरोबर मार्च 2026 मध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रात H-FAST अर्थात Hyderabad Food Adulteration Surveillance Team हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला.
हैदराबादसारख्या मोठ्या शहरात अन्नभेसळ, अन्नसुरक्षेशी संबंधित तक्रारी आणि Food Poisoning च्या घटना सातत्याने समोर येत होत्या. Food Safety विभागाकडे मर्यादित मनुष्यबळ आणि संसाधने असल्याने मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या अन्नभेसळीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आव्हानात्मक बनले होते.
ही परिस्थिती लक्षात घेऊन Hyderabad City Police च्या माध्यमातून H-FAST या स्वतंत्र पथकाची निर्मिती करण्यात आली. पोलिसांकडील गुप्त माहिती, क्षेत्रीय माहिती संकलन आणि तपासाची क्षमता Food Safety विभागाच्या तांत्रिक कौशल्याशी जोडण्यात आली.
Food Safety Officers आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या समन्वयाने संयुक्त छापे, नमुने संकलन, पुरावे गोळा करणे आणि दोषींविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची प्रभावी यंत्रणा उभारण्यात आली आहे.
292 टन भेसळयुक्त साहित्य जप्त; 208 गुन्हे दाखल
मार्च 2026 पासून H-FAST ने intelligence-based कारवाई सुरू केली असून अन्नभेसळ करणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर छापेमारी करण्यात आली.
उत्पादन केंद्रे, साठवणूक गोदामे, वितरण व्यवस्था आणि विक्री केंद्रांवर कारवाई करताना 208 गुन्हे दाखल करण्यात आले असून 232 प्रकरणे Food Safety Officer कडे सोपविण्यात आली आहेत.
या कारवाईत तब्बल 2 लाख 92 हजार 298 किलो अर्थात सुमारे 292 टन भेसळयुक्त साहित्य जप्त करण्यात आले आहे.
यामध्ये मसाले, तूप, दुग्धजन्य पदार्थ, मांसजन्य पदार्थ, चहा, फळे, बेकरी उत्पादने तसेच Ginger-Garlic Paste यांसारख्या विविध खाद्यपदार्थांचा समावेश आहे.
तपासादरम्यान काही खाद्यपदार्थांमध्ये Fabric Dye Colours, Synthetic Colours, हानिकारक रसायने, Palm Oil, Vanaspati, Starch आणि इतर अपायकारक पदार्थांचा वापर करून भेसळ केली जात असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती समोर आली आहे.
केवळ दुकानावर छापा नाही… थेट भेसळीच्या ‘मूळावर’ घाव!
H-FAST या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे केवळ एखाद्या दुकानावर छापा टाकून कारवाई करून थांबणे नाही. तर भेसळीचा मूळ स्रोत शोधणे आणि संपूर्ण पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्यावर भर दिला जात आहे.
तक्रारी, गुप्त माहिती आणि field intelligence च्या आधारे संशयित व्यवसायांची ओळख पटविली जाते. त्यानंतर Food Safety Officers आणि GHMC अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाद्वारे छापेमारी केली जाते.
नमुने संकलित करणे, पुरावे गोळा करणे, भेसळीचे मूळ ठिकाण शोधणे आणि पुरवठा साखळीचा मागोवा घेत दोषींवर कायदेशीर कारवाई करणे, अशा पद्धतीने ही मोहीम सुरू आहे.
अन्नभेसळीविरोधात पोलिस यंत्रणेचा थेट सहभाग घेऊन स्वतंत्र पथकाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेला हा अभिनव प्रयोग नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
अमली पदार्थांच्या माफियांविरोधात मोठा दणका
वैभव गायकवाड यांच्या कार्यक्षेत्रातील Hyderabad City Narcotics Wing ने मागील आठ महिन्यांत अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे.
या कालावधीत 400 पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले असून 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
एका मोठ्या कारवाईत सुमारे 3 कोटी रुपये किमतीचे Hash Oil जप्त करण्यात आले. तर आणखी एका महत्त्वपूर्ण कारवाईत झारखंडमधील रांची आणि मुंबई येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली.
हे आरोपी Speed Post च्या माध्यमातून जवळपास 22 राज्यांमध्ये गांजाचा पुरवठा करत असल्याचे तपासात समोर आले. मुंबईमध्ये लोकल ट्रेनच्या माध्यमातून घरपोच गांजाची डिलिव्हरी केली जात असल्याची माहितीही तपासातून उघड झाली.
या कारवाईत जवळपास 5 कोटी रुपयांचे संपूर्ण ड्रग नेटवर्क उघडकीस आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अमली पदार्थांच्या व्यवसायात सहभागी असलेल्या तसेच व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 35 विदेशी नागरिकांना देशातून हद्दपार करण्यात आले असून त्यांना पुन्हा भारतात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
फक्त तस्करांवर कारवाई नाही; व्यसनाची मागणी कमी करण्यावरही भर
नार्कोटिक्सविरोधातील कारवाई केवळ तस्कर, पुरवठादार आणि ड्रग माफियांपुरती मर्यादित ठेवण्यात आलेली नाही. अमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
तेलंगणा सरकारने सरकारी रुग्णालयांमध्ये De-addiction Centres सुरू केले असून अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना उपचार, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसनासाठी या केंद्रांमध्ये पाठविले जात आहे.
हैदराबादमध्ये अलीकडच्या काळात जवळपास 2 हजार व्यक्तींची Drug Testing करण्यात आली असून त्यापैकी सुमारे 800 व्यक्ती Drug Positive आढळल्या. या व्यक्तींना पुढील De-addiction आणि Rehabilitation प्रक्रियेत सहभागी करण्यात आले आहे.
यामध्ये केवळ राऊडीशीटर्स किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींचाच नव्हे, तर Street Crime मध्ये सहभागी असलेले लोक तसेच सुशिक्षित आणि IT व इतर क्षेत्रात कार्यरत व्यक्तींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.
‘Supply आणि Demand’वर एकाच वेळी प्रहार
अमली पदार्थांविरोधातील लढा केवळ तस्करांना पकडण्यापुरता मर्यादित न ठेवता त्यांची मागणी कमी करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
एकीकडे ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्या नेटवर्कवर धडक कारवाई, तर दुसरीकडे व्यसनाधीन व्यक्तींना उपचार आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न—अशी दुहेरी रणनीती हैदराबाद सिटी पोलिसांकडून राबविण्यात येत आहे.
तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचविणे, ड्रग माफियांची आर्थिक साखळी उद्ध्वस्त करणे आणि व्यसनाधीन नागरिकांना नवजीवन देणे, हा या मोहिमेचा व्यापक उद्देश असल्याचे दिसून येत आहे.
अहिल्यानगरचा भूमिपुत्र तेलंगणात गाजतोय!
अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळगाव माळवी या ग्रामीण भागातून भारतीय पोलीस सेवेत दाखल झालेल्या IPS वैभव रघुनाथ गायकवाड यांनी तेलंगणातील विविध आव्हानात्मक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत आपल्या कर्तृत्वाची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
Task Force, Narcotics Wing आणि H-FAST सारख्या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमधून त्यांनी संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांचा व्यापार आणि अन्नभेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे.
अन्नभेसळ करणारे व्यावसायिक, अमली पदार्थांचे तस्कर, संघटित गुन्हेगारीतील आरोपी आणि अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे कायदा मोडणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात IAS तुकाराम मुंडे यांच्या धडाडीच्या प्रशासनाची चर्चा होत असताना, तेलंगणात IPS वैभव गायकवाड यांची धडक कार्यशैली गुन्हेगारीविरोधातील कारवाईमुळे चर्चेत आली आहे.
अहिल्यानगरच्या मातीतून घडलेला हा भूमिपुत्र आज तेलंगणासारख्या मोठ्या राज्यात कर्तव्य बजावत आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवत आहे. त्यांची ही कामगिरी केवळ त्यांच्या गावासाठी किंवा जिल्ह्यासाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे.
चौकट : अहिल्यानगरच्या मातीचा ‘खाकी अभिमान’!
पिंपळगाव माळवी ते हैदराबाद DCP Task Force हा IPS वैभव गायकवाड यांचा प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. ग्रामीण भागातून येऊन देशातील सर्वोच्च पोलीस सेवेत स्थान मिळविणे आणि त्यानंतर संघटित गुन्हेगारी, ड्रग माफिया व अन्नभेसळखोरांविरोधात कठोर कारवाई करत महानगराच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणे, हा प्रवास निश्चितच उल्लेखनीय आहे.
कर्तव्य, निर्भीडपणा आणि प्रभावी अंमलबजावणी यांच्या जोरावर अहिल्यानगरचा हा भूमिपुत्र तेलंगणात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करत आहे.