राज्य सरकारच्या “माझी लाडकी बहीण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक हजार रुपयांचा लाभ दिला जातो. आतापर्यंत लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्यापर्यंतचा हप्ता मिळालेला असून, तो सप्टेंबर महिन्यात त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता असल्याने लाखो महिलांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अपात्र महिलांचा लाभ थांबवण्यासाठी नवा निर्णय
या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे सरकारच्या पडताळणीत समोर आले आहे. अनेक अशा महिला ज्यांचे कुटुंबाचे उत्पन्न ठरविलेल्या निकषापेक्षा जास्त असूनही त्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले. विशेषत: अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या महिलांनीसुद्धा या योजनेतून पैसे घेतल्याचे आढळले. त्यामुळे अपात्रांना आळा घालण्यासाठी सरकारने केवायसी प्रक्रिया सक्तीची केली आहे.
पती वा वडिलांची केवायसी बंधनकारक
नव्या नियमांनुसार केवळ महिलांचीच नव्हे, तर तिच्या कुटुंब प्रमुखाची म्हणजे विवाहित असल्यास पतीची, आणि अविवाहित असल्यास वडिलांची केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे केवायसीच्या माध्यमातून त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची शहानिशा केली जाईल.
अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ थांबणार
या योजनेचा लाभ फक्त वार्षिक अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या महिलांनाच मिळणार आहे. मात्र लाभार्थी महिलेच्या पतीचे किंवा वडिलांचे उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास ती महिला आपोआप अपात्र ठरेल. त्यामुळे आतापर्यंत लाभ घेणाऱ्या अनेक महिलांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लाभार्थ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी
सरकारच्या नव्या नियमांमुळे अनेक महिला लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. “आम्हाला लाभ सुरू राहील का?” हा प्रश्न अनेक महिलांसमोर निर्माण झाला आहे. योजनेतून अपात्र ठरणाऱ्या महिलांसाठी ही मोठी निराशाजनक बाब ठरणार आहे. तर दुसरीकडे, सरकारच्या मते योग्य पात्र लाभार्थ्यांपर्यंतच योजना पोहोचावी यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.