अहिल्यानगर │ केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शहा हे दि. ०४ ऑक्टोबर २०२५ ते ०५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विमानतळ, श्री साईबाबा मंदिर शिर्डी, काकडी ता. राहाता, लोणी ता. राहाता तसेच कोपरगाव तालुक्यात नियोजित दौऱ्यावर येणार आहेत. या अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना राबवल्या असून, संपूर्ण परिसराला No Fly Zone घोषित करण्यात आले आहे.
संपूर्ण राहाता व कोपरगाव तालुका रेड झोनमध्ये
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) अन्वये राहाता व कोपरगाव तालुक्यातील हवाई क्षेत्र दि. ०४ ऑक्टोबर रोजी पहाटे ००:०१ वाजेपासून ते दि. ०५ ऑक्टोबर रात्री २४:०० वाजेपर्यंत Red Zone (Temporary Red Zone – No Fly Zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या कालावधीत कोणत्याही प्रकारचे ड्रोन किंवा अन्य उडणारी साधने वापरण्यास सक्त मनाई असेल.
ड्रोन वापरावर कठोर बंदी
अलीकडेच अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या कार्यक्रमांमध्ये आयोजक व सहभागी यांच्याकडून फोटोग्राफीसाठी ड्रोन उडविल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ तसेच इतर लागू असलेल्या कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येईल.
आदेशाची अंमलबजावणी एकतर्फी पद्धतीने
हा आदेश तातडीच्या परिस्थितीमुळे एकतर्फी (ex parte) पद्धतीने लागू करण्यात आलेला असून, तो दि. ०५ ऑक्टोबर रात्री २४:०० वाजेपर्यंत लागू राहणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा तसेच सुरक्षा यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
शिर्डीत सुरक्षेची कडक व्यवस्था
अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे शिर्डी परिसरात पोलीस, CRPF, गुप्तचर यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. दौऱ्यातील प्रत्येक कार्यक्रमासाठी सुरक्षेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
अमित शहाणच्या दौऱ्यामुळे शिर्डीला आले छावणीचे रूप
संपूर्ण शिर्डी शहर, राहाता व कोपरगाव तालुके सुरक्षेच्या दृष्टीने छावणीच्या रूपात परिवर्तित झाले आहेत. प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी, पोलिसांचा वाढीव ताफा, गस्त पथके, तसेच आकाशातून लक्ष ठेवण्यासाठी विशेष तैनाती करण्यात आली आहे.