शिर्डी | प्रतिनिधी
साईबाबांच्या पवित्र नगरी शिर्डीत गेल्या काही महिन्यांपासून मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या गेटबंदीमुळे भाविकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगर–मनमाड महामार्गावरून येणाऱ्या मार्गांवर तसेच मंदिराभोवतीच्या अनेक गेटस् बंद करण्यात आल्याने भाविकांना मुक्तपणे दर्शन घेता येत नाही, अशी नाराजी साईभक्तांमध्ये वाढू लागली आहे.
शिर्डी हे साईबाबांचे ‘मुक्त मंदिर’ म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. परंतु सध्या मंदिर परिसरात जणू ‘जेल’सारखी परिस्थिती निर्माण झाल्याची भावना अनेक भक्त व्यक्त करीत आहेत. ग्रामस्थांनाही परिसरात सहज जाता येत नाही. “भक्त शिर्डीत येतात, पण त्यांना त्या पवित्र जागेचा आनंद आणि समाधान मिळत नाही. कारण सर्वत्र बंदिस्त वातावरण आहे. हे साईबाबांच्या शिकवणीला धरून नाही,” असे सुवर्ण समाजाचे ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागरे यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “साईबाबांनी नेहमी सर्व धर्म, जाती, पंथातील लोकांना एकत्र आणले. परंतु आज मंदिर परिसरात गेटबंदीमुळे भक्तीचा प्रवाह अडखळतोय. सर्व गेट त्वरित खुले करून भाविकांना पूर्वीसारखे मुक्त वातावरण दिले पाहिजे. नाहीतर साईभक्तांचा ओढा हळूहळू कमी होईल आणि शिर्डीतील भक्तीमयता मंदावेल.”
📍 “संस्थानमध्ये वाढलेला हस्तक्षेप चिंताजनक”
नागरे यांनी साई संस्थान प्रशासनावर अप्रत्यक्ष टीका करत म्हटलं की, “संस्थानमध्ये आता अधिक हस्तक्षेप वाढल्याने स्थानिक भावना आणि भक्तांचा सन्मान कमी होत चालला आहे. निर्णय घेताना गावकऱ्यांचा आणि भाविकांचा आवाज ऐकला गेला पाहिजे. साई मंदिर हे फक्त संस्थानचे नाही तर जनतेचे आहे.”
📍 व्यापारी व ग्रामस्थांचीही नाराजी
गेटबंदीमुळे शिर्डीतील व्यापारी व ग्रामस्थ वर्गातही नाराजी वाढली आहे. भाविकांच्या ये-जा मर्यादित झाल्याने स्थानिक व्यवसायावर परिणाम होत आहे. हॉटेल, लॉजिंग, आणि भक्तनिवास चालविणाऱ्यांना याचा थेट फटका बसत आहे.
📍 “साईंच्या नगरीत पुन्हा भक्तीचा प्रकाश पसरू द्या”
शिर्डी हे केवळ पर्यटनस्थळ नसून साईभक्तांसाठी ती एक आध्यात्मिक यात्रा आहे. त्यामुळे गेटबंदी हटवून शिर्डी पुन्हा पूर्वीसारखी ‘मुक्त नगरी’ व्हावी, अशी मागणी साईभक्तांकडून केली जात आहे.