
शिर्डी प्रतिनिधी
महंत रामगिरी महाराजांचा जीव धोक्यात असल्याचा इशारा देत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने त्यांना झेड प्लस सिक्युसिटी देण्याचे आवाहन केले. हे आम्ही नाही तर ज्यांच्या सांगण्यावरून तुम्ही मुस्लिम धर्म आणि धर्मगुरूंबद्दल बोलले तेच लोक तुमच्या जिवाशी खेळायला मागेपुढे पाहणार नाही आणि आमचे नाव पुढे करतील, असे माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले.
सत्तेसाठी हे लोक काहीही करू शकतात, असे जलील म्हणाले. एकूणच जलील यांच्या इशाऱ्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. रामगिरी महाराजांविरुद्ध ५८ एफआयआर दाखल होऊनही पोलिसांनी कारवाई केली नाही. मुख्यमंत्री उलट बोलतात की रामगिरी महाराजांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही.
त्यामुळे आम्ही सरकारला ५ दिवसांचा वेळ रामगिरी महाराजांवर कारवाई करण्यासाठी देत आहोत. सहाव्या दिवशी आम्ही मुंबईकडे कूच करू, राज्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी गाड्या तयार करून ठेवा. मुंबईला जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना संविधान भेट देऊ. पोलिसांना त्यांनी जेव्हा पदाची शपथ घेतली त्या शपथेची प्रत देऊ, असे जलील म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत जलील म्हणाले, की रामगिरी महाराजांनी आता अलर्ट राहावे. थोडेही खुट्ट झाले तरी पहावे, की आपल्या जिवाला काही धोका तर नाही. आम्ही त्यांच्या जवळही जाणार नाही. तर तेच लोक असतील ज्यांच्या सांगण्यावरून त्यांनी वक्तव्य केले, असे जलील म्हणाले.