शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी शहरातील पिंपळवाडी रोड जवळील अण्णाभाऊ साठे नगर मधील रहिवाशांचे शिर्डी नगरपरिषदेने पिण्याचे पाणी अचानक नळ कनेक्शन कट करून बंद केले असल्याने येथील रहिवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून शिर्डी नगरपरिषदेने आम्हाला पूर्ववत पिण्याचे पाणी देण्याचे त्वरित सुरू करावे,
अन्यथा येत्या गुरुवारी शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचा हंडा मोर्चा काढण्यात येईल. तसेच येथील रहिवासी या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करतील .असा इशाराही अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवाशांनी व महिलांनी दिला आहे.
शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात येथील रहिवाशांनी म्हटले आहे की,आम्ही गेल्या ३० ते ४० वर्षांपासून शिर्डी येथील अण्णाभाऊ साठे नगर येथे राहतो. सन 1995 च्या अगोदर पासून आम्ही तेथे राहत आहोत.
घरपट्टी ही आम्ही भरतो. पिण्याचे पाणी नगरपरिषदेमार्फत आम्हाला अनेक वर्षापासून मिळते पाणीपट्टीही आम्ही भरतो. असे असताना ऐन उन्हाळ्यात आम्हाला शिडीं नगर परिषदेने आम्ही राहत असलेल्या ठिकाणी शासनाची जागा असल्याने ती जागा येत्या १५ दिवसात खाली करून देण्यासाठी नोटीस दिलेली आहे.
आणि ज्या दिवशी ही नोटीस दिली आहे. त्याच दिवशी आमचे पिण्याचे पाणी बंद करून टाकल्याने आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गेल्या पाच सहा दिवसापासून आम्हाला पिण्याचे पाणी नाही.आमच्या महिला नगर परिषद कार्यालयात गेल्या असता तेथील संबंधित अधिकारी गायकवाड यांना आमचे पाणी का बंद केले? अशी विचारणा केली असता गायकवाड यांनी आमच्या महिलांना सांगितले कि ,
आम्हाला मुख्याधिकारी साहेबांनी पाणी बंद करण्याचे सांगितले आहे. वास्तविक पाहाता नगर परिषद कोणालाही पिण्याच्या पाण्या पासून वंचित ठेऊ शकत नाही. साईबाबांनी कोणालाही उपाशी ठेवले नाही. मात्र आता साईबाबांच्या शिर्डीत नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी अण्णाभाऊ साठे नगर मधील गोरगरीब मागासवर्गीयांना व येथील नऊ कुटुंबांना जाणीवपूर्वक ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाणीचे कनेक्शन कट करून पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे.
नगरपरिषद हिटलरशाही पद्धतीने काम करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आमचे बंधू आहेत. त्यांनी आम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये दिले आहेत. मात्र हे पंधराशे रुपये आम्हाला नाही दिले तरी चालतील मात्र पिण्याचे पाणी देऊन आमची, आमच्या वृद्ध माता पिता, लहान मुले, घरातील सदस्यांची तहान भागवावी. असे भावनात्मक आवाहन या निवेदनातून करत नगरपरिषदेने आम्हाला पिण्याचे पाणी त्वरित पूर्ववत सुरू करावे.
आम्ही विकत पिण्याच्या पाण्याचा टँकर घेऊ शकत नाही .आमची तशी परिस्थिती नाही आम्ही मागासवर्गीय, गोरगरीब आहोत. असे म्हटले असून जर उद्या बुधवारी सकाळी आम्हाला पिण्याचे पाणी मिळाले नाहीतर आम्ही अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर परवा गुरुवारी हंडा मोर्चा काढून ठिप्या आंदोलन करू.
असा इशारा या निवेदनात दिला असून या निवेदनावर समीर रामचंद्र वीर,अंबादार कांबले,सिताराम रोकडे,मधुकर वाघमारे, रविंद्र भोडंगे, दगू कांबळे, बबन रामा शिरसाट, सोमनाथ आरणे, आदींसह महिलांची नावे आहेत .