

राहाता (प्रतिनिधी) : साकुरी शिवारातील खटकली रोडवरील हॉटेल आठवणच्या मागच्या शेडमध्ये सुरू असलेल्या कथित जुगार अड्ड्यावर राहाता पोलिसांनी धाड टाकून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी रोख रक्कम, पत्ते व जुगाराचे साहित्य असा ₹१६,०६० चा मुद्देमाल जप्त करून ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या कारवाईनंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी चर्चा संपूर्ण राहाता तालुक्यात सुरू झाली आहे.
या प्रकरणात नईम सलीम सय्यद, जुनेद बाबा शेख, राजेंद्र एकनाथ बोरुडे, अमीर शेखलाल शेख, गणेश विठ्ठल जेजुरकर, दिलीप वामन बोरुडे, अजय जगन्नाथ गाढे, सचिन योसेफ बनसोडे आणि संदीप रामचंद्र जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून किरण रामदास पगार हा आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी धाड टाकली तेव्हा घटनास्थळी ४५ ते ५० जण उपस्थित होते. मात्र, अधिकृत गुन्हा केवळ ९ जणांवरच दाखल झाल्याने उर्वरित व्यक्तींना कोणत्या कारणावरून सोडण्यात आले, हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे. “धाडीत उपस्थित असलेले सर्वच जण तपासाच्या कक्षेत आले का?”, “त्यांची नावे नोंदविण्यात आली का?”, “सर्वांची चौकशी झाली का?” असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
स्थानिकांमध्ये अशीही चर्चा आहे की, या क्लबचा संबंध सचिन योसेफ बनसोडे यांच्याशी जोडला जातो. ते यापूर्वी साकुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहिले असून सध्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. नागरिकांच्या दाव्यानुसार, या परिसरात कथितरित्या अनेक वर्षांपासून पत्त्यांचा क्लब सुरू असून वेळोवेळी पोलिसांकडून धाडी पडतात; मात्र काही दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी जुगार सुरू झालेले असल्याचे दिसून येते.
यामुळे “वारंवार धाडी पडत असतानाही हा अड्डा कायम सुरू कसा राहतो?”, “कारवाईनंतरही जुगाराला आळा का बसत नाही?”, “मुख्य सूत्रधारांपर्यंत तपास पोहोचतो का?” असे प्रश्न आता अधिक तीव्र झाले आहेत.
या सर्व चर्चांवर राहाता पोलिसांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपास, फरार आरोपीचा शोध आणि या अड्ड्याबाबतची पोलिसांची पुढील भूमिका याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
संशयाला खतपाणी देणारी पोलिसांची गोपनीयता?
साकुरीतील कथित जुगार अड्ड्यावर मोठी धाड टाकून अनेकांना ताब्यात घेतल्याची चर्चा असताना, या कारवाईची अधिकृत माहिती प्रसारमाध्यमांना तत्काळ देण्यात आली नाही, व माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली अशी चर्चा स्थानिक पत्रकार आणि नागरिकांमध्ये सुरू आहे. एवढी मोठी कारवाई करूनही पोलीस प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जारी करण्यास किंवा अधिकृत माहिती देण्यास झालेल्या विलंबामुळे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्थानिकांमध्ये अशी चर्चा आहे की, धाडीदरम्यान मोठ्या संख्येने लोक उपस्थित असल्याचे सांगितले जात असताना अधिकृत गुन्ह्यात मर्यादित आरोपींचीच नोंद करण्यात आली. त्यामुळे कारवाईची संपूर्ण माहिती सुरुवातीपासूनच माध्यमांपासून दूर का ठेवण्यात आली? असा सवाल उपस्थित होत आहे. ह्यामागील गौडबंगाल काय आहे अजूनही गुलदस्त्यात आहे
साकुरी शिवारातील ज्या ठिकाणी कथित जुगार अड्ड्यावर कारवाई झाली, ते हॉटेल ‘आठवण’ व संबंधित क्लब अतिक्रमित जागेत असल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणाबाबत नगर परिषदेला माहिती असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे “अतिक्रमणाबाबत नगर परिषद मौन का?”, “नियम सर्वांसाठी समान आहेत की काहींना अपवाद?” असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
नूतन पोलीस अधीक्षकांची ठोस भूमिका काय?
राहाता तालुक्यात बेकायदा जुगार, मटका व इतर अवैध धंद्यांवर कठोर कारवाईची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी अवैध धंद्यांमधून गुन्हेगारीला खतपाणी मिळाल्याची चर्चा होती. अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी नूतन पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून सखोल चौकशी करावी, जुगार अड्ड्यांच्या मूळ सूत्रधारांपर्यंत कारवाई पोहोचवावी आणि अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
याप्रकरणी पोलीस प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार, याकडे आता संपूर्ण राहाता तालुक्याचे लक्ष लागले आहे.