अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील दुर्गापुर येथे वाळू वाहतूक रोखल्याच्या कारणावरून गावचे सरपंच नानासाहेब आण्णासाहेब पुलाटे (वय 48) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. पुलाटे हे शेती व कॉन्ट्रॅक्टर व्यवसायासोबत दुर्गापुर ग्रामपंचायतीचे सरपंच असून, सुमारे दोन महिन्यांपूर्वी ग्रामसभेत वाळू बंदीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता.
🔹 वाळू वाहतूक रोखल्याने संताप — आरोपींकडून फोनवर धमक्या
दि. 19 ऑक्टोबर 2025 रोजी सरपंच पुलाटे यांच्या मोबाईलवर शरद बाबासाहेब आहेर (रा. लोणी खुर्द) याने वारंवार फोन करून “तु आमची वाळू काय बंद करतोस?” अशा शब्दांत शिवीगाळ व धमक्या दिल्या. त्याच्यासोबत आकाश किशोर विखे (रा. लोणी) व फारुक शब्बीर शेख (रा. हसनापुर) हेही फोनवर उपस्थित होते. त्यांनी पुलाटे यांना “दुर्गापुर फाट्यावर ये” असे आव्हान दिले.
🔹 दुर्गापुर फाट्यावर टोळीचा हल्ला — लोखंडी रॉड व दांडक्यांनी मारहाण
रात्री सुमारास 9 वाजता पुलाटे आपल्या चुलत भावासह दुर्गापुर फाट्यावर गेले असता, दोन चारचाकी वाहनांतून आलेल्या शरद आहेर, आकाश विखे, फारुक शेख आणि त्यांच्या 7 ते 8 साथीदारांनी सरपंच पुलाटे यांना घोळका घालून लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. हल्ल्यात त्यांच्या डोक्यास व जबड्यास गंभीर दुखापत होऊन ते बेशुद्ध पडले.
🔹 सहकाऱ्यांनाही मारहाण — उपचार सुरू
या घटनेत मध्यस्थी करण्यास गेलेले किरण पुलाटे, सोमनाथ पुलाटे, अमोल पुलाटे आणि गणेश वाकचौरे यांनाही आरोपींकडून मारहाण झाली. गंभीर जखमी नानासाहेब पुलाटे यांना प्रथम प्रवरा हॉस्पिटल, लोणी येथे दाखल करण्यात आले. सध्या ते डॉ. विखे पाटील फाउंडेशन हॉस्पिटल, विळदघाट, अहिल्यानगर येथे उपचार घेत आहेत.