
शिर्डी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यामध्ये गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून, गुंतवणूक करण्यास भाग पाडून ,नंतर मात्र फसवणूक करण्याचे प्रकार अनेक शहरांमध्ये उघडकीस आले असताना शिर्डीतही असा प्रकार ग्रो मोर ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली सुरू असल्याची गुंतवणूकदारांमध्ये खाजगीत चर्चा सुरू आहे.
आणि गुंतवणूकदार या ट्रेडिंग कंपनीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्याच्या प्रयत्नात आहेत. तसे अनेक गुंतवणूकदार बोलत आहेत. याची खबर या ग्रोमोर ट्रेडिंग कंपनीच्या चालकाला लागताच त्याने मोबाईलवर एका मेसेज द्वारे गुंतवणूकदारांना एकीकडे भावनिक आवाहन केले आहे. तर याच मेसेज मध्ये दुसरीकडून एक प्रकारे तुम्ही जर माझ्यावर गुन्हा दाखल केला ,
किंवा मला माझे काम करू दिले नाही. त्रास दिला,व मला जेलमध्ये टाकल्या नंतर जर सर्वांना पैसे मिळत असतील तर तुमच्या सोयीने तुम्ही पहा, असे उघडपणे हा कोट्यावधी रुपये घेऊन गायब झालेला या कंपनीचा चालकांने या मेसेज मधून सांगत एक प्रकारे गुंतवणूकदारांना उघड धमकी देण्याचे काम आता सूरू केल्याचे दिसून येत आहे.
आलेल्या या मेसेज चा अर्थ असा आहे की, कोणी गुंतवणूकदाराने या कंपनीच्या चालकावर गुन्हा दाखल करू नये. जेणेकरून त्याने अवलंबलेले वेळ काढू पणाचे धोरण यशस्वी होईल व त्यानंतर हा फरार होऊ शकतो. याची शक्यताही नाकारता येत नाही .अशी चर्चा सध्या गुंतवणूकदारांमध्ये हा मेसेज वाचल्यानंतर सुरू झाली आहे.
या ग्रो मोर ट्रेडिंग कंपनीचा चालकांने मोबाईल वरून जीएम प्रावेट एज्युकेशनल या अकाउंट वरून गुंतवणूकदारांसाठी एक मेसेज टाकला आहे. असे तरी सुकृत दर्शनी समजते. या मेसेज मध्ये म्हटले आहे की जून अखेरचे पूर्ण नियोजन सर्व विस्कळीत करण्याचे काम काही गुंतवणूकदार हे करीत आहेत.
आणि सोशल मीडियाचा गैरवापर करून मला धमकी देत आहेत. जर आपल्याला थांबायचे नव्हते तर आपण तेव्हा मार्च महिन्याच्या मीटिंगमध्ये बोलायचे होते .माझी मानसिक तयारी करून घेतली असती. पण त्यावेळी सर्वांनी होकार दिला आणि आता मात्र मला त्रास चालू झाला आहे.
आणि हा त्रास भयंकर आहे. माझ्याकडे एवढी मालमत्ता नाही की मी प्रत्येकाला ती देऊ शकेल किंवा नावावर गुंतवणूकदारांच्या करू शकेल. आपण गुंतवणूक करताना माझी मालमत्ता पाहिली नव्हती. मग मला आता गुन्हा दाखल करण्याची धमकी का? मी सुरक्षित राहिलो व माझे कामात व्यस्त आहे.
जर ते मी करू शकलो तर मला आपले पैसे देणे शक्य होईल अन्यथा माझ्यावर केस टाकून मला जेलमध्ये टाकून जर तुम्हाला पैसे मिळत असतील तर तुमच्या सोयीने तुम्ही पहा! असे स्पष्टपणे या मेसेज मध्ये म्हटले असून हा फक्त गुंतवणूकदारांसाठीच असणारा ग्रुप असून अतिशय गुप्त पद्धतीने हा मेसेज पोहोचवण्याचे काम होत असते.
कारण हा सगळा अनधिकृत आर्थिक उलाढालीचा विषय आहे. मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणे हा गुन्हा आहेच. मात्र एवढी मोठी रक्कम कशी, कोठून, कधी आली. इन्कम टॅक्स भरला गेला की नाही? हा पैसा व्हाईट मनी की ब्लॅक मनी आहे. या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे.
देशातील अगदी अनेक राजकीय सामाजिक औद्योगिक अशा क्षेत्रातील लोकांवर ईडीच्या धाडी पडतात. आर्थिक गुन्हा शाखा तपास करते , महाराष्ट्रात शेवगाव सातारा कोल्हापूर संभाजीनगर आदी शहरातही अशा ट्रेडिंग नावाने अनेकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे .गुन्हे दाखल झाले आहे. काहींना अटक झाली आहे.
मग असे राज्यात घडत असताना शिर्डीतील हा शेअर ट्रेडिंग कंपनीचा प्रकार काय आहे ,या कंपनीच्या चालकांकडे अचानक एवढे पैसे आले कोठून? स्वतःचा खाजगी कार्यक्रम करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले गेले कसे? या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे .असे गुंतवणूकदारांमध्ये चर्चा असून या कंपनीच्या चालकाने जे मेसेज द्वारे गुंतवणूकदारांना जो संदेश दिला आहे
त्यातून एकच निष्पन्न होते की जर तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल केला तर आपले पैसे मिळणार नाहीत. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना ही उघडपणे एक प्रकारे धमकी आहे. गुंतवणूकदारांनी जमीन विकून सोने-चांदीचे दागिने विकून गुरेढोरे विकून कर्ज काढून या कंपनीच्या चालकाकडे मोठा परतावा मिळेल.
या आशेने पैसे गुंतवणूक केले .मात्र आता हा कंपनीचा चालक महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात गेल्याचे समजते. मागे एकदा व्हिडिओ कॉल मेसेज द्वारे मी पंधरा दिवसात शिर्डीत येऊन आपणाला प्रत्यक्ष भेटेल असे गुंतवणूकदारांना म्हणणारा या कं.चा चालक दीड दोन महिने झाले तरी अजून येथे तपास नाही.
त्यामुळे ह्या नवीन मेसेज वर विश्वास कसा ठेवायचा. त्यामुळे हा मेसेज मोबाईलवर टाकला व जून पर्यंत वाट पाहावी असे भावनिक आव्हान केले असले तरी जून महिन्याला फक्त दहा दिवस बाकी आहेत. सर्व गुंतवणूकदार पैशाची मागणी करत आहेत. दहा दिवसात हा कंपनीचा चालक गुंतवणूकदारांची कोट्यविधीची रक्कम कुठून, कशी देणार !हा एक प्रश्न आता गुंतवणूकदारांमधून खाजगीत व्यक्त होत आहे.
त्यामुळे या कंपनीच्या चालकाने आता प्रत्यक्ष शिर्डीत येऊन गुंतवणूकदारांची मीटिंग घेऊन खरे काय आहे ते सांगितले पाहिजे. गुंतवणूकदारांचे पैसे परत दिले पाहिजे. अन्यथा गुंतवणूकदार असेही पैसे जाणार व तसेही पैसे जाणार पण या कंपनीच्या चालक व इतर संचालकांना आम्ही सोडणार नाही गुन्हा तर दाखल करूच परंतु गुंतवणूकदारांच्या पैशावर कमवलेली संपत्ती मालमत्ता ही गुंतवणूकदार घेतल्याशिवाय राहणार नाही असेही आता गुंतवणूकदारांमधून चर्चा ऐकू येत आहे.