साई पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी लाखो साई भक्तांनी घेतले साई दर्शन!
शिर्डी –
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने आयोजित केलेल्या १०५ व्या पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहिल. तर मंदिर व मंदिर परिसरात मुंबई येथील व्दारकामाई मंडळाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व “श्री राम मंदीर ” हा भव्य देखावा व हैद्राबाद येथील दानशुर साईभक्त श्रीमती रेणुका चौधरी यांच्या देणगीतून करण्यात आलेली आकर्षक फुलांची सजावट साईभक्तांसाठी लक्षवेधी ठरली.
आज उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. पारायण समाप्तीनंतर श्री साईबाबांच्या प्रतिमेची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी विणा, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर व उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी, सौ.मालती यार्लगड्डा, प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, पुजारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर सकाळी ०७.०० वाजता संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मालती यार्लगड्डा यांच्या हस्ते समाधी मंदिरात पाद्यपुजा करण्यात आली.
सकाळी ०९.०० वाजता शिर्डी शहरातून काढण्यात आलेल्या भिक्षा झोळी कार्यक्रमात संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, पुजारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.प्रभंजन भगत यांचे किर्तन झाले. तसेच सकाळी १०.३० वाजता संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मालती यार्लगड्डा यांच्या हस्ते समाधी मंदिराचे समोरील स्टेजवर आराधना विधी करण्यात आला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त उपस्थित होते.

दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्लंघन करण्यात आले. सायंकाळी ०६.०० वाजता श्रींची धुपारती झाली. तर रात्रौ ०७.३० ते १०.०० यावेळेत श्री.शैलेंद्र भारती, मालाड (ई), मुंबई यांचा साई भजन संध्या हा कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर होईल. रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या रथाची शिर्डी शहरातून सवाद्य काढण्यात आलेल्या मिरवणूकीत संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्तांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदविला. तर श्री साईप्रसादालयामध्ये साईभक्तांच्या देणगीतून भक्तांना मोफत प्रसाद भोजन देण्यात आले. तसेच बेंगलोर येथील साईभक्तांनी श्रीसाई प्रसादालय करीता रक्कम रु. ३० लाख ५० हजार मात्र किंमतीचे एक अत्याधुनिक स्वयंचलित आटा युनिट देणगी स्वरुपात दिले आहे. सदर आटा युनिट मध्ये गहु साफ सफाई, निवडणे, दळणे हि कामे स्वयंचलित होणार आहेत. या आटा युनिटव्दारे प्रति तास १००० किलो आटा उपलब्ध होणार असुन सदर युनिट हे FSSAI चे नियमावली नुसार तयार करण्यात आलेले आहे.
उद्या बुधवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी उत्सवाच्या तृतिय दिवशी पहाटे ०५.०५ वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा होईल. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्यान्ह आरती, दुपारी ०४.०० ते ०६.०० यावेळेत ह.भ.प. प्रभंजन भगत यांचे कीर्तन कार्यक्रम श्रींचे समाधी मंदिराच्या उत्तर बाजुचे स्टेजवर होणार आहे. सायंकाळी ०६.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते ०९.४५ यावेळेत शाहिर श्री उत्तम रामचंद्र गायकर, वाघेरे, जि. नाशिक यांचा साई भजन संध्या कार्यक्रम हा कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपातील स्टेजवर होईल. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होणार आहे.