
शिर्डी | प्रतिनिधी
राज्य शासनाच्या पर्यावरण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये शिर्डी नगरपरिषदेनं पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला आहे. नाशिक विभागातील २५ हजार ते ४० हजार लोकसंख्या गटातील नगरपालिकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत शिर्डी नगरपरिषद ७५ लाख रुपयांच्या बक्षिसाची मानकरी ठरली आहे.
विशेष म्हणजे हे अभियान सुरू झाल्यापासून सलग पाच वर्षे शिर्डी नगरपरिषद राज्यात अव्वल स्थानी राहत असून कोट्यवधी रुपयांची बक्षिसे पटकावत पर्यावरण संवर्धनात आदर्श निर्माण केला आहे.
🏆 मुंबईत होणार भव्य सत्कार सोहळा
शनिवार, दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे.
🌳 हरित शिर्डीसाठी प्रभावी उपक्रम
सन २०२४-२५ या कालावधीत शिर्डी नगरपरिषदेकडून पुढील पर्यावरणपूरक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली –
मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड व संगोपन
हरित क्षेत्रात वाढ व मोकळ्या जागांचे संवर्धन
घनकचरा प्रक्रिया प्रकल्प
अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती
प्रदूषण नियंत्रण व नाविन्यपूर्ण उपक्रम
शहर सुशोभीकरण
पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन व ओढ्या-नाल्यांचे नूतनीकरण
या सर्व उपक्रमांमुळे शिर्डी शहर अधिक स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक बनत असल्याचे दिसून येत आहे.
👏 नागरिकांचा सहभाग ठरला यशाचा गाभा
मुख्याधिकारी श्री. सतीश दिघे यांनी सांगितले की, “हे यश शिर्डीकर नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे शक्य झाले. पर्यावरण संवर्धनासाठी पुढेही अधिक प्रभावी उपक्रम राबवले जातील.”
नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, “शिर्डीचा राज्यातील अव्वल क्रमांक कायम राखण्यासाठी सर्वांनी स्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग नोंदवावा.”
💬 लोकप्रतिनिधींचा मोठा वाटा
उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी नमूद केले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे तसेच सुजय विखे यांनी पर्यावरण आणि स्वच्छता विषयक कामांसाठी विविध स्तरावर मोठा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
🌍 शिर्डी शहराने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, “हरित विकास आणि स्वच्छता” हीच खरी प्रगतीची दिशा आहे. सलग पाच वर्षांचा मानाचा तुरा शिर्डीच्या शिरपेचात रोवला गेला असून, राज्यात पर्यावरण क्षेत्रात आदर्श निर्माण करण्याचा मान शिर्डीने मिळवला आहे. 🌿✨

