
शिर्डी | प्रतिनिधी
श्री साईबाबांच्या कृपेने देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांना जागतिक स्तरावर मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. संस्थानने धार्मिक, सामाजिक तसेच मानवसेवेच्या क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याची दखल घेत विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून संस्थानला ‘ऑनर सर्टिफिकेट’ प्रदान करून गौरविण्यात आले आहे.
विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अध्यक्ष तसेच १८४ वर्ल्ड रेकॉर्ड करणारे पहिले भारतीय म्हणून ओळख असलेले डॉ. दीपक हरके यांनी हा सन्मान संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्याकडे औपचारिक समारंभात प्रदान केला. या वेळी संस्थानचे वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख तसेच प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या गौरव समारंभास प्र. उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, प्र. प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ, मुख्य कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे यांच्यासह संस्थानच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित राहून सन्मानाच्या क्षणाचे साक्षीदार ठरले.
श्री साईबाबा संस्थानकडून दरवर्षी लाखो भाविकांना मोफत दर्शन सुविधा, महाप्रसाद, आरोग्य सेवा, स्वच्छता, सुरक्षितता तसेच आपत्ती व्यवस्थापनासारख्या विविध सेवा पुरविल्या जातात. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण, जलसंवर्धन व पर्यावरणपूरक उपक्रमांच्या माध्यमातून समाजासाठी भरीव योगदान दिले जाते. या सर्व कार्यांची दखल घेऊन विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
या जागतिक मान्यतेमुळे श्री साईबाबा संस्थानचे धार्मिक आस्था आणि मानवसेवेचे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले आहे. साईभक्तांच्या सेवेसाठी संस्थानने घेतलेली सकारात्मक भूमिका आणि व्यवस्थापनातील पारदर्शकता यांना यामुळे नवी ओळख मिळाली आहे.
या सन्मानाबद्दल समाधान व्यक्त करताना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, “हा सन्मान संपूर्ण साईभक्त समुदायाचा असून साईबाबांच्या कृपेने भाविकांच्या सेवेसाठी आम्ही अधिक तत्परतेने कार्य करत राहू.”
विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून मिळालेल्या या गौरवामुळे शिर्डीचे नाव जागतिक पातळीवर आणखी उजळले असून श्री साईबाबा संस्थानसाठी हा सन्मान प्रेरणादायी आणि अभिमानास्पद ठरला आहे.
🙏 सबका मालिक एक — या साईवचनाचा वारसा जपत संस्थानची सेवा अखंड सुरूच राहणार आहे.
