
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड समोर आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात चर्चा रंगल्या असताना अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेना (यूबीटी) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे.
मनसे आणि शिवसेना बालेकिल्ल्यात समान जागा वाटून घेणार आहे. दरम्यान उर्वरित महानगरासाठी 60:40 चा फॉर्म्युला स्वीकारण्याची शक्यता आहे अशी सूत्रांची माहिती आहे.उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होणार हे आता जवळपास निश्चित झालं असून फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी आहे.
दरम्यान महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना जागांच्या यादी तयार करण्यास सांगण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्या युतीची अधिकृत घोषणा कधी करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना (यूबीटी) आणि मनसे यांच्यातील औपचारिक युती दिवाळीच्या आसपास जाहीर होऊ शकते,
जेव्हा महापालिका निवडणुकीचा पहिला टप्पा होण्याची शक्यता आहे. तसंच शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यातही ही घोषणा केली जाऊ शकते असं बोललं जात आहे. शिवसेना (यूबीटी) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी (बीएमसी २०२५) युती होण्याची शक्यता आहे.
ही युती ठाकरे घराण्यातील दोन बंधूंच्या एकत्र येण्याने राजकीय समीकरणे बदलू शकते. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर (जसे हिंदी सक्ती विरोध) दोघे एकत्र आले असून, यामुळे बीजेपी-शिंदे गटाला आव्हान मिळू शकते. युती झाल्यास मुंबईतील मराठी मतदारांचा फायदा होईल, पण मनसेचा निवडणुकीतील इतिहास मर्यादित असल्याने फायदा किंवा तोटा याबाबत चर्चा आहे.