शिर्डी प्रतिनिधी | साई दर्शन न्यूज
शिर्डी – राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
“निवडणूक आयोगाविरोधात मोर्चे काढणं म्हणजे विरोधकांच्या हतबलतेचं द्योतक आहे. त्यांना आधीच दिसतंय की आगामी निवडणुकीत त्यांचं अपयश ठरलेलं आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

मंत्री भोसले म्हणाले, “महाविकास आघाडीनं कितीही जुळवाजुळव केली तरी जनतेचा त्यांच्यावर विश्वास उरलेला नाही. लोकसभेत त्यांना यश मिळालं, पण विधानसभेत ते साफ अपयशी ठरले. त्यातून अजून ते सावरलेले नाहीत.”
राज ठाकरे यांच्या नमो सेंटरवरील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भोसले म्हणाले, “छत्रपतींचा विषय काढल्याशिवाय काही लोकांना निवडणुकीत मुद्देच मिळत नाहीत. नमो सेंटरवर बोलण्याआधी ते काय आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे, हे जाणून घ्यावं. विरोध फक्त विरोधासाठी करू नये.”
पूरग्रस्त भागातील स्थितीवर बोलताना त्यांनी सांगितलं, “सरकारनं शेतकऱ्यांना उदारहस्ते मदत केली. त्यामुळे विरोधकांना तो मुद्दा गेला. आता ते भावनिक मुद्द्यांवर लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.”
महाविकास आघाडीच्या मोर्चाबाबत ते म्हणाले, “आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण आरोप करताना तथ्यांवर बोललं पाहिजे. ईव्हीएम आणि मतदार याद्या यावर बिनबुडाचे आरोप करून स्वतःचं अपयश दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत.”
भोसले यांनी स्पष्ट केलं की, “महायुती सरकार राज्यातील विकास, पूरग्रस्त मदत आणि नागरिकांच्या हिताच्या कामांवर लक्ष केंद्रित करत आहे. जनतेचा विश्वास आमच्यावर आहे.”
शेवटी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि श्री साईबाबा संस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. साईबाबांच्या कृपाशिर्वादाने महाराष्ट्र शांतता, विकास आणि एकतेच्या मार्गावर पुढे जाईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
साईंच्या चरणी नतमस्तक — श्री साईबाबा संस्थानकडून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार 🌸
शिर्डीत आगमनानंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन राज्यातील जनतेसाठी साईबाबांच्या आशीर्वादाची प्रार्थना केली.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ तर्फे त्यांचा शाल, श्रीफळ आणि साईचरित्र पुस्तक देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या वेळी संस्थानचे अधिकारी, विश्वस्त आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
भोसले यांनी साईबाबांच्या पवित्र भूमीतून राज्यातील शांतता, विकास आणि जनकल्याणासाठी साईबाबांचे आशीर्वाद मागितले.