साईंच्या शिर्डीत रंगपंचमी साजरी करणे करिता देश- विदेशातून भाविक येत असतात. बाबांची भक्तीची आणि रंगाची उधळण अनुभवून तृप्त होतात. अश्या उत्सवांच्या वेळी श्री साईबाबा संस्थान कडून भाविकांची काळजी घेतली जात असते. मलेशिया येथील साईभक्त श्री. रमण व त्यांच्या पत्नी सौ. ईश्वरी ह्या देखील रंगपंचमी करिता काल शिर्डीत आले होते.

गेट क्र.1 येथे मंदिरात प्रवेश करत असताना श्री. रमण यांच्या बोटामधील 12 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी नकळत खाली पडून गेली. दर्शन करून ते हॉटेल ला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, जवळपास एक लाख रु किमतीची सोन्याची अंगठी कुठेतरी हरवली. हे दाम्पत्य गेल्या नऊ वर्षांपासून मलेशिया वरून साईंच्या दर्शनाकरिता दरवर्षी शिर्डीत येत असतं.
यापूर्वी असं कधी त्यांच्या सोबत घडलेलं नव्हतं. त्यांना दुःख झाले व अंगठी परत भेटेल कि नाही याबाबत शंका होती, परंतु त्याबरोबर बाबांवर ” श्रद्धा ” होती. ती अंगठी गेट क्र. 1 येथे ड्युटीला असलेल्या संरक्षण विभागाच्या ‘कंत्राटी’ महिला कर्मचारी श्रीमती ” श्रद्धा ” सोनवणे यांना सापडली. महिलांना सोन्याची आवड असते आणि पारख हि असते.
अंगठी सोन्याची, वरून तिच्यावर डायमंड, परंतु त्यांच्या मनात प्रामाणिक पानाची ज्योत जागृत होती. त्यांनी अंगठी संरक्षण कार्यलयात जमा केली. अंगठीचे मूल्य काढले. 12 ग्रॅम वजनाची ( किंमत 96,000/- ) जवळपास एक लाख रु किमतीची सोन्याची अंगठी मासिक वीस हजार रु पगार असण्याऱ्या आमच्या संस्थान कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे परत केली.

मलेशियाचे साईभक्त जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. हजारोंच्या गर्दीत हरवलेली वस्तू परत भेटते. ही साईलीला आहे. प्रामाणिक महिला कर्मचारी श्रीमती श्रद्धा सोनवणे यांचा श्री साईबाबा संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार करून कौतुक व अभिनंदन केले.