अहिल्यानगर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत विद्युत वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद केली आहे. या कारवाईत ६ आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल ₹4,23,800/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

📌 कर्जत तालुक्यातील शिंदे गावातून 25 लाखांचा कॉपर कोर चोरी
दि. २२ सप्टेंबर रोजी शिंदे ता. कर्जत येथील तुकाई चारीचे लिफ्ट इरिगेशन सब स्टेशनमधून ₹25,72,400/- किमतीचे कॉपर कोर व ऑईल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
📌 पोलिसांच्या सापळ्यात आरोपी, शिर्डी बाजारतळातील रहिवासीही सहभागी
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मच्छिंद्र काळे याच्यासह एकूण सहा जणांना जेरबंद केले. तर काही आरोपी अजून फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या टोळीत शिर्डी बाजारतळ येथील प्रविण उर्फ पवन पवार याचाही सहभाग असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
📌 आरोपींवर यापूर्वी घरफोडी व चोरीचे १३ गुन्हे दाखल
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी किशोर खेलु पवार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत १३ गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. या कारवाईचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले असून पुढील तपास कर्जत पोलीस करत आहे.