
शिर्डी प्रतिनिधी :
शिर्डीत गुरूपौर्णिमा उत्सवास भक्तीमय वातावरणात सुरूवात झाली आहे. साईनामाचा जयघोष करत हजारो भाविक पायी पालख्यांसह शिर्डीत दाखल झाले आहेत. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांना आपला गुरू मानत बुधवारी असंख्य भाविक साईचरणी नतमस्तक झाले.

साईबाबांच्या अनुमतीनं सुरू झालेला गुरुपौर्णिमा उत्सव आजही साईबाबा संस्थान तितक्याच भक्तीभावात साजरा करतय. यंदाच्या वर्षी 9 जुलै ते 11 जुलै असा हा तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव संस्थानच्या वतीनं साजरा केला जातोय. बुधवारी पहाटे काकड आरतीनंतर साईंच्या मूर्तीस आणि समाधीस मंगल स्नान घालण्यात आलं.
त्यानंतर मंदिरातून साईंचा फोटो, वीणा आणि साई सच्चरित्र ग्रंथाची सवाद्य मिरवणूक साई मंदिरातून गुरुस्थान मार्गे द्वारकामाईत नेण्यात आली. द्वारकामाईत विधीवत पूजा करून साई सच्चरित्राच्या अखंड पारायणाच्या पठणास सुरुवात करण्यात आली.
साई सच्चरित्राचा पहिला अध्याय साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पठण केला. त्यानंतर इतर भाविक साईंच्या चरित्राचं अखंड पठण करत असून गुरूवारी सकाळी या पठणाची सांगता होणार आहे.
गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं साई मंदिर परिसर आणि गर्भगृहास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून साई मंदिरासह परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी एक अनोखी पर्वणी गुजरातच्या साईभक्तांनी उपलब्ध करून दिली आहे. साई मंदिरासमोरील सरंजाम बागेत साईंच्या शिर्डीतील वास्तव्यास सुरुवात झाल्यापासून ते आजपर्यंतच्या शिर्डीचे विविध पैलू दर्शवणाऱ्या दोन हजार छायाचित्रांचं प्रदर्शन भरवलं आलं आहे.
साईबाबांचे जीवनचरित्र साई चरित्रातून वाचावयास मिळते. मात्र एकाच ठिकाणी छायाचित्र रुपात साईंचे जीवनचरित्र गुजरातच्या भाविकांनी संकलित करून ते शिर्डीत पहिल्यांदाच सादर केले आहे. यात साईबाबांच्या समकालीन भक्तांचेही विविध फोटो या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत