श्रीरामपूर (प्रतिनिधी) – जुन्या गाड्यांची खरेदी–विक्री, त्यात बोगस कागदपत्रांचा वापर आणि व्याजाच्या व्यवहारांचा वाढता प्रकार यावर अखेर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
काल दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी श्रीरामपूर–बेलापूर–देवळाली रस्त्यावर अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने व श्रीरामपूर शहर पोलिसांनी एकत्रित कारवाई करत छापा टाकला असता, १३५ दुचाकी व २१ चारचाकी (कार, जीप, ट्रॅक्टर) असा तब्बल १५६ वाहनांचा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे.
या कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, हे ठिकाण शोरूमलाही लाजवेल इतका मोठा साठा असलेले केंद्र असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून चौकशी सुरू केली असून, वाहनांच्या मालकी, वापर आणि खरेदी–विक्री व्यवहाराचा सखोल तपास सुरू आहे.
🕵️♂️ कोण आहेत मालक? व्यवहार रोखीत का ऑनलाईन? पोलिसांचा तपास वेगात
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांकडून सध्या प्रत्येक वाहनमालकांशी स्वतंत्र संपर्क साधला जात आहे. या वाहनांचा वापर नेमका कोण करत होता, त्या वाहनांचे मालक कोण, खरेदी–विक्रीची परवानगी कोणाकडे आहे, एवढा मोठा साठा कोणत्या कायदेशीर अधिनियमाखाली करण्यात आला — या सर्व बाबींची तपासणी सुरू आहे.
तसेच या वाहनांच्या खरेदी–विक्रीतील लाखोंच्या व्यवहाराचे स्वरूप – तो रोख, चेक की ऑनलाईन याचा शोध घेण्याचे कामही सुरू आहे.
या चौकशीतून अनेक आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणुकीचे प्रकार समोर येण्याची शक्यता असल्याचे पोलिस वर्तुळात म्हटले जात आहे.
⚠️ बेलापूर–श्रीरामपूर परिसरात खळबळ; आरटीओ व वित्तीय व्यवहारांची चौकशी सुरू
या छाप्यानंतर बेलापूर रोडवरील तसेच श्रीरामपूरातील जुन्या वाहनांच्या खरेदी–विक्री करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
आरटीओच्या नियमांनुसार अशा वाहन व्यवहारांना स्पष्ट परवानगी नसतानाही, मोठ्या प्रमाणात अवैध वाहन खरेदी–विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे तपासात उघड झाले आहे.
अनेक नागरिकांनी पूर्वी फसवणुकीच्या तक्रारी दिल्या होत्या, पण त्यावर ठोस कारवाई न झाल्याचेही समोर येत आहे.
🛺 शिर्डीतही अनेक बोगस रिक्षा, एपे आणि मोटारसायकली! नागरिकांची मागणी – तात्काळ कारवाई व्हावी
दरम्यान, शिर्डी शहरातही अशाच प्रकारे अनेक बोगस रिक्षा, एपे व मोटारसायकली विनापरवाना व विनाकागदपत्र फिरत असल्याची नागरिकांकडून लेखी तक्रार देण्यात आली आहे.
मात्र अद्याप संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
स्थानिक नागरिकांचा ठाम सूर असा की —
“ज्या प्रकारे श्रीरामपूर पोलिसांनी छापा टाकून मोठा साठा उघडकीस आणला,
त्या पद्धतीनेच शिर्डीतील अवैध वाहने जप्त करून, रस्त्यावरचा बोगस व्यवहार थांबवावा.”
शिर्डीकरांनी अप्पर पोलीस अधीक्षकांकडे तातडीने लक्ष देऊन या सर्व अवैध वाहनांवर विशेष मोहीम हाती घेण्याची मागणी केली आहे.

📰 दैनिक साई दर्शन – शिर्डी / श्रीरामपूर प्रतिनिधी