शिर्डी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सावळीविहीर येथे आठ दिवसांपूर्वी घडलेल्या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बालाजी ट्रेडर्स किराणा मालाचे मालक अमित विजयकुमार दोशी यांच्या दुकानात मध्यरात्री दोन अज्ञात चोरट्यांनी दोरीच्या सहाय्याने दुसऱ्या मजल्यावर प्रवेश करून लाखोंची चोरी केली.

💰 ११ तोळे सोने आणि रोकड चोरट्यांच्या ताब्यात
या धाडसी चोरीत चोरट्यांनी सुमारे रोख ४ लाख २२ हजार रुपये, तसेच १११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (नेकलेस, अंगठ्या, बांगड्या, कानातील रिंग, मंगळसूत्र, ब्रेसलेट) आणि दोन चांदीच्या ताट्या चोरून नेल्या. एकूण चोरीचा अंदाज सुमारे सात लाख २२ हजार रुपयांपर्यंत आहे. मात्र, सध्याच्या सोन्याच्या बाजारभावानुसार या दागिन्यांची किंमत सुमारे १३ लाख रुपये होत असल्याने ही चोरी अधिक गंभीर मानली जात आहे.
🕵️ सीसीटीव्हीत पकडले चोरट्यांचे हालचालीचे दृश्य
दुकान व घर असलेल्या इमारतीत चोरटे जवळपास आठ मिनिटे होते, अशी माहिती सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आली आहे. चोरट्यांनी कोणताही दरवाजा फोडला नाही, किंवा कोणावर हल्ला केला नाही. त्यांनी पूर्ण तयारीनिशी आणि रेकी करून ही चोरी केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दोन्ही चोरटे अंदाजे ३२ ते ३४ वयोगटातील असल्याचे दिसून येते.
👮 तपासाचा वेग वाढवण्याची जैन समाजाची मागणी
या घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी पहिल्याच दिवशी घटनास्थळी भेट दिली होती. श्वानपथक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांनी तपास केला असून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे अधिकारी यांनीही पाहणी केली आहे. तरीही आठ दिवस उलटून गेल्यानंतरही तपास न लागल्याने शिर्डी व परिसरातील जैन समाजात संतापाचे वातावरण आहे. लवकरच जैन समाजाचे शिष्टमंडळ जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करणार आहे.
शिर्डी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी सांगितले की, “तपास जलद गतीने सुरू आहे आणि लवकरच आरोपींना गजाआड केले जाईल.”
