शिर्डी | प्रतिनिधी :
सावळीविहीर बु. येथील सोमैय्या विद्यामंदिरच्या आर्थिक व्यवहारात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला असून, बनावट सह्या करून संस्थेच्या तब्बल ३३ लाख ४२ हजार ६३३ रुपयांची रक्कम हडप केल्याच्या आरोपावरून वरिष्ठ लिपिकाविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शिक्षण संस्थेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी सोमैय्या विद्यामंदिर, लक्ष्मीवाडी, सावळीविहीर बु.चे प्रभारी प्राचार्य संजय नथु राऊत (वय ५२, रा. वारी, ता. कोपरगाव) यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संस्थेत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेला विठ्ठल विश्वनाथ पवार (रा. कारवाडी-कोकमठाण, ता. कोपरगाव) याच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, राऊत यांनी २ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर शाळेच्या विविध विभागांची कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली. यावेळी शाळेच्या बँक खात्यांचे स्टेटमेंट तपासताना काही रक्कम रोखीने काढण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यानंतर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित बँकेत जाऊन १६ जानेवारी आणि १० फेब्रुवारी २०२६ रोजी रोख रक्कम काढण्यासाठी सादर करण्यात आलेले धनादेश तपासले. या धनादेशांवरील अधिकृत स्वाक्षऱ्या बनावट असल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले, असा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
तथ्य शोध समितीसमोर गैरव्यवहाराची कबुली?
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्थेने २४ मार्च रोजी तथ्य शोध समिती स्थापन केली. दुसऱ्या दिवशी समितीसमोर वरिष्ठ लिपिक विठ्ठल पवार यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान पवार यांनी बँकेतून रोख रक्कम काढणे, पीएफ व टीडीएसची रक्कम जमा न करणे तसेच अधिकृत स्वाक्षऱ्यांचा गैरवापर केल्याबाबत लेखी कबुली दिल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
संस्थेच्या चौकशीत एकूण ७५ लाख ७५ हजार ५८८ रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यापैकी ४२ लाख २५ हजार ९२५ रुपये धनादेशाद्वारे परत करण्यात आले, मात्र उर्वरित ३३ लाख ४२ हजार ६३३ रुपये परत करण्यास पवार यांनी टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पदाचा गैरवापर करून संस्थेला आर्थिक फटका
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत वरिष्ठ लिपिक पदाचा गैरवापर करून बनावट सह्या करत संस्थेची रक्कम स्वतःकडे वळविल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. वारंवार मागणी करूनही उर्वरित रक्कम परत न केल्याने अखेर संस्थेने पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणामुळे शाळेच्या आर्थिक व्यवहारांवर देखरेख कोणाची होती, बनावट सह्या करून धनादेशाद्वारे रक्कम कशी काढली गेली आणि या गैरव्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पोलिसांनी फिर्यादीच्या आधारे विठ्ठल विश्वनाथ पवार याच्याविरुद्ध आर्थिक गैरव्यवहार व फसवणुकीसंदर्भात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तपासात या प्रकरणातील संपूर्ण आर्थिक व्यवहार आणि संभाव्य इतर संबंधितांची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.