
शिर्डी येथे ग्रो-मोअर कंपनीच्या माध्यमातून पंचक्रोशीतील अनेक लोकांना कोटवधी रुपयांचा फटका बसला असताना अजून एक मोठा फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे.
बी के कुबेर अॅपच्या नावाखाली जालना जिल्ह्यातील दोघांनी आकर्षक परतावा व साखळी योजनेंतर्गत ग्राहक मिळवून देण्यासाठी मोठे कमिशन देत शिर्डी मधील गोरगरीब जनतेची आर्थिक फसवणूक केल्याचे नुकतेज उघड झाले आहे. गुंतवणूक केल्यास एक टक्का व ग्राहक जोडल्यास गुंतवणुकीवर ३ टक्के नफा अशा स्वरूपाचे ग्राहकांना आमिष दाखवले गेले.
त्यावर ग्राहकांनी विश्वास ठेवून लाखो रुपयांची गुंतवणूक केल्याचे समजते. जानेवारी २०२५ मध्ये ग्राहकांच्या खात्यात पैसे येणे बंद झाल्याने सदर घोटाळा समोर आला आहे. यावर गुंतवणूकदारांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, शिर्डीचे पोलिस निरीक्षक रणजित गलांडे, यांच्याकडे तक्रार अर्ज केला असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
सामान्य जनतेच्या लाखो रुपयांच्या फसवणुकीबाबत आरोपीवर कारवाई व्हावी, अशी मागणी विनोद पटेल या गुंतवणूकदाराने केली आहे.