

दिनांक 08/09/2025 रोजी सौ. सरस्वती शिवाजी दुसुंगे रा. दुसुंगेमळा, पिंपळगांव उज्जैनी रोड, कापुरवाडी, ता. जि. अहिल्यानगर या सकाळी 11.30 वा. चे सुमारास त्यांचे घराशेजारील मळगंगा देवीच्या मंदीरामध्ये दर्शनासाठी गेल्या असता अनोळखी 3 इसमांनी त्यांचे तोंड दाबुन व अग्निशस्त्र डोक्यास लावुन त्यांचे गळ्यातील व कानातील 2,35,000/- रुपये किमतीचे
सोन्याचे दागिने जबरीने चोरुन नेले आहे. सदर घटनेबाबत भिंगार पोलीस स्टेशन गु.र.नं. 496/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(4), 352, 3(5), आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री किरणकुमार कबाडी, पोउपनि/दिपक मेढे, पोउपनि/राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार विष्णु भागवत, भगवान थोरात, सुनिल मालणकर, भगवान धुळे, अर्जुन बडे अशांनी गुन्हा ठिकाणी भेट देवुन अशा प्रकारे गुन्हे करणारे आरोपींची माहिती संकलित केली. गुन्ह्यातील आरोपींचा व्यवसायीक कौशल्य व गुप्त बातमीदाराचे आधारे माहिती काढत असतांना सदरचा गुन्हा हा विठ्ठल तुपे रा. जेऊर हैबती, कुकाणा याने व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली.
त्यानुसार सदर आरोपीचा शोध घेत असतांना सदर आरोपी हा त्याचे साथीदारासह कुकाणा येथे येणार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने पथकाने तात्काळ कुकाणा या ठिकाणी सापळा रचुन आरोपी नामे 1) विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे वय 24 वर्षे, रा. जेऊर हैबती, कुकाणा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, 2) सुदाम विक्रम जाधव वय 29 वर्षे, रा. सुलतानपुर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचा साथीदार 3) फिरोज अजिज शेख रा. नेवासा फाटा, ता. नेवासा (फरार) याचेसह केला असल्याचे कळविले.
ताब्यातील आरोपींकडे गुन्ह्यातील गेला माल व हत्याराबाबत विचारपुस करता त्यांनी गुन्ह्यातील चोरीचे दागिने कुकाणा येथील सोनारास व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल ही त्यांचे मित्राची असल्याचे सांगितल्याने 1,35,000/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, व 70,000/- रुपये किमतीची एम.एच. 17 डी. ई. 7751 क्रमांकाची पल्सर मोटारसायकल असा एकुण 2,05,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
आरोपी विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे याचेविरुध्द यापुर्वी नेवासा पोलीस स्टेशन व तोफखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी दरोडा व जबरी चोरीचे 02 गुन्हे दाखल असुन आरोपी सुदाम विक्रम जाधव याचेविरुध्द यापुर्वी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे चोरीचा 01 गुन्हा दाखल आहे.
ताब्यातील आरोपींना भिंगार पोलीस स्टेशन गु.र.नं. 496/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(4), 352, 3(5), आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.