
दलापूरमधील अल्पवयीन मुलींवर लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूला ते पाच पोलिस जबाबदार आहेत, असा निष्कर्ष कोठडी मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत न्यायदंडाधिकाऱ्यांनी काढला आहे. स्वतःच्या बचावासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्याचे पोलिसांचे म्हणणे संशयास्पद वाटते, असेही अहवालात नमूद आहे.

‘त्या बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे आढळले नाहीत. स्वतःच्या बचावासाठी अक्षयवर गोळ्या झाडल्याचे पोलिसांचे म्हणणे संशयास्पद वाटते. झटापटीत अक्षयवर नियंत्रण मिळवण्यासाठी बळाचा वापर केला, हे पोलिसांचे म्हणणेही न्यायोचित वाटत नाही’ असे निरीक्षण न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवले आहे.
‘गोळा केलेले पुरावे आणि न्यायसहायक प्रयोगशाळेचा अहवाल लक्षात घेता, अक्षय शिंदे याच्या पालकांचे आरोप योग्य वाटतात. पोलिस या मृत्यूला जबाबदार आहेत, असा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात नोंदवला आहे’, अशी माहिती न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने आज सुनावणीदरम्यान दिली.