नगर दक्षिण मतदारसंघात मतदान संवेदनशील पातळीवर झाले. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंकेंचा यांच्या नीलेश लंके प्रतिष्ठानचे 15 पदाधिकारी मतदान झालेले ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही स्ट्रांग रूममध्ये तळ ठोकून बसलेले आहेत.
ईव्हीएमच्या गोदामाभोवती खडा पोलिस बंदोबस्त असला तरी नीलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने सीसीटीव्ही स्ट्राँग रूममध्ये डोळ्यात तेल घालून हालचालींवर लक्ष देत आहेत.
हे पदाधिकारी माजी आमदार नीलेश लंकेंना दिवसभराचे रिपोर्टंग करतात. या पदाधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून ओळखपत्र देखील देण्यात आली आहेत. हेच पदाधिकारी सीसीटीव्ही रूममध्ये येऊ शकतात. ओळखपत्रांशिवाय अन्य कोणाला येथे परवानगी दिली जात नाही.
प्रतिनिधींनी ओळखपत्रांनुसार प्रशासकीय यंत्रणेकडून चौकशी करून सीसीटीव्ही स्ट्राँग रूमकडे सोडले जाते. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने निवडणुकीतील प्रत्येक उमेदवाराला आपआपली माणसे सीसीटीव्ही रूममध्ये येऊन पूर्णवेळ राहण्याची परवानगी दिली आहे.
परंतु नीलेश लंके यांच्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी सोडून अन्य कोणत्याही उमेदवारांचे प्रतिनिधी येथे पूर्णवेळ दिसत नाहीत. भाजप उमेदवारांचे पदाधिकारी दिवसभरातून अधून-मधून येऊन आढावा घेतात.