श्रीरामपूर | प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीला फूस लावून बंदुकीचा धाक दाखवत अपहरण करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला मा. विशेष व सत्र न्यायाधीश-१ एस. एन. साळवे यांनी अत्यंत कठोर शिक्षा सुनावत नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास ठोठावला आहे. या निकालामुळे श्रीरामपूरसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, महिला व बालकांवरील अत्याचार करणाऱ्यांना न्यायालयाने कठोर संदेश दिला आहे.
३ जून २०२४ रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी योगेश सिताराम पाटेकर व इतरांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३, ३६६(अ), ३७६(२)(एन), १०९, ३४ तसेच पॉक्सो कायद्यातील कलम ४, ८, १२, १६, १७ आणि भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी पीएसआय रावसाहेब वेणुनाथ शिंदे यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने ९ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. पीडिता अल्पवयीन असल्याचे, आरोपीने तिला फूस लावून बंदुकीचा धाक दाखवत पळवून नेल्याचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करण्यात आले. आरोपीने सर्व आरोप फेटाळले असले तरी न्यायालयाने त्याचा बचाव ग्राह्य धरला नाही. पीडितेची ठाम साक्ष आणि सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत आरोपीला दोषी ठरवण्यात आले.
न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३६३ अंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी व ₹१,००० दंड, कलम ३६६(अ) अंतर्गत सात वर्षे सक्तमजुरी व ₹१,००० दंड तसेच पॉक्सो कायद्यातील कलम ४ अंतर्गत नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास, ₹१०,००० दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. तसेच दंडाची रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अॅड. पी. पी. गटणे, एम. आर. नवले आणि एन. आर. कहाणे यांनी प्रभावी बाजू मांडली. तर न्यायालयीन कामकाजात पीएसआय घाणे यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली.
या कठोर शिक्षेमुळे अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा कठोर इशारा मिळाला असून, न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
