
शिर्डी | प्रतिनिधी
शिर्डीतील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी असून, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी आणि नाट्य रसिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या ३२ व्या श्री साईसच्चरित पारायण सोहळा – २०२६ साठी अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. यावर्षी हा पारायण सोहळा १३ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.
या सोहळ्यात देश-विदेशातून हजारो साईभक्त सहभागी होऊन श्री साईसच्चरिताचे सामूहिक पारायण करतात. गेली ३२ वर्षे अखंड सुरू असलेल्या या आध्यात्मिक परंपरेमुळे शिर्डीतील पारायण सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भक्तांना नियोजनबद्ध पद्धतीने सहभागी होता यावे यासाठी यंदा ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पारायण सेवेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या साईभक्तांनी www.saiparayan.org� या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांनी लवकरात लवकर आपले नाव नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आयोजकांनी सर्व साईभक्तांना या पवित्र पारायण सेवेत सहभागी होण्याचे तसेच ही माहिती आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि साईभक्तांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले आहे. श्रावण महिन्यात होणारा हा पारायण सोहळा भक्ती, श्रद्धा आणि साईनामाच्या अखंड गजराने शिर्डी नगरीला आध्यात्मिक उत्साहाने भारून टाकणार आहे.

