
शिर्डी | प्रतिनिधी
साईनगरी शिर्डीत बेकायदेशीर वैश्याव्यवसायावर अहिल्यानगर पोलिसांनी ऐतिहासिक व धडक कारवाई करत गुन्हेगारी टोळ्यांना मोठा दणका दिला आहे. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री. सोमनाथ घार्गे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर मा. श्री. सोमनाथ वाकचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३५ वाजता पिंपळवाडी रोडवरील हॉटेल साई सहारा, शिर्डी येथे सुरू असलेल्या वैश्याव्यवसायावर संयुक्त छापा कारवाई करण्यात आली.
या कारवाईत अमोल भिमा भोसले (वय २४) व गणेश सिताराम कानडे (वय ४१) या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ९९४/२०२५ अन्वये त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ७, ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे, या दोन्ही आरोपींवर यापूर्वीही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून, हे आरोपी सराईत व सवयीचे गुन्हेगार असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. अमोल भारती यांनी सदर गुन्ह्यास भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १११ वाढीव स्वरूपात लावण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर मा. श्री. सोमनाथ वाकचौरे यांनी तात्काळ मंजुरी दिली.
यानुसार शिर्डी पोलीस स्टेशनला PITA कायद्यास भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १११ लावून आजपर्यंत प्रथमच वाढीव कारवाई करण्यात आली असून, ही कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील माइलस्टोन ठरणारी धडक पोलिसी कारवाई मानली जात आहे.
सध्या सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, या प्रकरणामुळे साईनगरीतील बेकायदेशीर धंद्यांना ठोस आळा बसणार असल्याची भावना साईभक्त व नागरिकांतून व्यक्त होत आहे. कायद्याचा धाक दाखवत गुन्हेगारी मोडीत काढण्याचा पोलिसांचा निर्धार या कारवाईतून स्पष्टपणे दिसून आला आहे.
संघटित गुन्हेगारीवर कायद्याची वज्रकाठी
नवीन फौजदारी कायदा भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 111 हे संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. हे कलम मोक्का (MCOCA) कायद्याच्या धर्तीवर असून, संघटित स्वरूपात गुन्हे करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाईसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते.
🔹 कलम 111 कधी लागू होते?
➡️ आरोपींनी यापूर्वी एकत्रितपणे दोन किंवा अधिक गंभीर गुन्हे केले असल्यास
➡️ गुन्हे संघटित स्वरूपाचे असल्याचे तपासात स्पष्ट झाल्यास
🔹 कलम 111 अंतर्गत शिक्षा काय?
➡️ जन्मठेपेपर्यंत शिक्षा होण्याची तरतूद
➡️ हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा मानला जातो
🔹 परवानगी कोण देतो?
➡️ पोलीस अधीक्षक किंवा अपर पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी यांची लेखी परवानगी आवश्यक
🔹 जामीनाबाबत काय फरक पडतो?
➡️ कलम 111 लागू झाल्यानंतर आरोपींना किमान 1 वर्ष जामीन मिळण्याची शक्यता नाही
➡️ सदर कलम नसते, तर आरोपी 8 ते 10 दिवसांत जामिनावर बाहेर आले असते
🔹 शिर्डीसाठी ऐतिहासिक बाब
➡️ वेश्याव्यवसायासारख्या गंभीर गुन्ह्यात कलम 111 जिल्ह्यात प्रथमच लागू
➡️ नवीन कायद्याची प्रभावी आणि धाडसी अंमलबजावणी पोलिसांकडून करण्यात आली
➡️ या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांना कठोर इशारा देण्यात आला असून, साईनगरीत कायद्याचा दरारा पुन्हा एकदा प्रस्थापित झाला आहे.

