
श्रीरामपूर | प्रतिनिधी एक्सक्लुझिव्ह : ‘ग्रो मोअर’ घोटाळ्याचा पर्दाफाश सर्वप्रथम दैनिक साई दर्शननेच केला! 🟥
⬛ दुपटीच्या परताव्याच्या आमिषाखाली सुरू असलेल्या
‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’च्या महाफसवणुकीचा भंडाफोड
सर्वप्रथम दैनिक साई दर्शनने निर्भीडपणे उघडकीस आणला.
⬛ शिर्डीसह नगर, नंदुरबार व इतर भागांत शेकडो गुंतवणूकदारांची
कोट्यवधींची लूट होत असल्याचे वास्तव
दैनिक साई दर्शनच्या बातम्यांमुळे जनतेसमोर आले.
⬛ या बातम्यांची दखल घेत
पोलीस प्रशासन हलले,
आणि अखेर ‘ग्रो मोअर’ कार्यालयावर छापा टाकून
कार्यालय सील करण्याची कारवाई झाली.
⬛ सामान्य गुंतवणूकदारांचा आवाज बनून,
दबावाला न घाबरता सत्य मांडणाऱ्या
दैनिक साई दर्शनच्या पत्रकारितेमुळे
आज आरोपी अडचणीत सापडले आहेत.
⬛ सत्य, निर्भीड आणि जनहिताची पत्रकारिता म्हणजे
दैनिक साई दर्शन — पुन्हा एकदा सिद्ध!
दुपटीने परतावा देण्याचे गाजर दाखवून शिर्डीसह राज्यातील शेकडो नागरिकांची ३०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची आर्थिक लूट करणाऱ्या ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’ कंपनीवर अखेर पोलिसांचा लोखंडी हात कोसळला आहे. कंपनीचा मुख्य सूत्रधार भूपेंद्र पाटील याच्या पूर्व भागातील कार्यालयावर शुक्रवारी सायंकाळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई करण्यात आली.
पोलिस पथकाने कार्यालयाची सखोल झाडाझडती घेतली. ही कारवाई केवळ दिखाऊ नसून रात्री उशिरापर्यंत चाललेली नियोजनबद्ध तपासणी होती. संपूर्ण तपासणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले असून, सर्व प्रक्रिया पंचासमक्ष रीतसर पंचनामा करून पूर्ण करण्यात आली. तपासादरम्यान महत्त्वाचे आर्थिक दस्तऐवज, गुंतवणूकदारांची नावे, व्यवहारांच्या नोंदी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.
फसवणुकीच्या गंभीर स्वरूपाची दखल घेत कार्यालयावर तात्काळ सील लावण्यात आले आहे. संबंधित व्यक्तींना समन्स बजावण्यात आले असून, कंपनीकडे गुंतवणूक गोळा करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या आहेत की नाहीत, याची कायदेशीर पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘ग्रो मोअर’विरोधात पोलिसांकडे तोंडी तसेच अप्रत्यक्ष स्वरूपात तक्रारींचा अक्षरशः भडिमार सुरू होता. अनेक गुंतवणूकदार भीतीपोटी पुढे येत नव्हते. मात्र, पुढील मोठी फसवणूक टाळण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी स्वतः पुढाकार घेत ही कारवाई केल्याने प्रशासनाच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.
प्राथमिक तपासात शिर्डीसह नंदुरबार, नगर जिल्हा व इतर भागांतील शेकडो गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा चुना लावण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकांनी आयुष्याची पुंजी, निवृत्तीचे पैसे, कर्ज काढून गुंतवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, अवास्तव आणि दुपटीचे परतावे देणाऱ्या योजना या सरळसरळ फसवणूक असतात. ‘ग्रो मोअर’ किंवा भूपेंद्र पाटीलशी संबंधित व्यवहारांमध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी तत्काळ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई केवळ सुरुवात असून, पुढील टप्प्यात गुन्हा दाखल होणे, मालमत्ता जप्ती व अटक कारवाई होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘ग्रो मोअर’ प्रकरणामुळे राज्यभरातील बोगस इन्व्हेस्टमेंट कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

