अहिल्यानगर – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश मा. पोलीस अधीक्षक मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने आज श्रीरामपुर शहरात मोठी कारवाई करत तिघा इसमांना गावठी कट्ट्यासह जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तब्बल 7,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
विशेष पथकाची तयारी
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांनी पोउपनि. समीर अभंग व अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, संतोष खैरे, योगेश कर्डीले, बाळासाहेब गुंजाळ, रमिझराजा आतार व अरुण मोरे यांचे विशेष पथक तयार करून अवैध शस्त्रविक्री करणाऱ्यांचा माग घेतला.
बातमीदाराची गोपनीय माहिती
14 नोव्हेंबर रोजी पथकाला माहितीदारामार्फत कळाले की तीन इसम गावठी कट्टा विक्रीसाठी बेलापुरहून श्रीरामपुराकडे येणार आहेत. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार पथकाने अनारसे हॉस्पिटलजवळ सापळा रचून वाहनाची वाट पाहिली.
सापळा यशस्वी – तिघे इसम पकडले
थोड्याच वेळात सांगितलेले वाहन दिसताच पथकाने ते थांबवून आत असणाऱ्यांची विचारपूस केली. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- आनंदा यशवंत काळे (44)
- विशाल बबन सोज्वळ (28)
- विजय यशवंत काळे (48)
झडतीदरम्यान कारच्या डॅशबोर्डमधून गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे, तीन मोबाईल तसेच होंडा सिटी कार (MH 03 CS 9466) असा एकूण 7,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रेकॉर्डवरील आरोपी पुन्हा जाळ्यात
ताब्यात घेतलेल्यांपैकी आनंदा काळे हा जुना रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर लूट, चोरी, दरोडा यांसह आर्म्स अॅक्टअंतर्गत अनेक गुन्हे नोंद आहेत.
पुढील तपास सुरू
रमिझराजा रफिक आतार यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 1010/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक पोलीस करीत आहेत.