आळंदी –
ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीसाठी निघालेल्या उरण येथील भाविकांवर काळाने निर्दयी घाला केला आहे. आळंदीला जाणाऱ्या दिंडीमध्ये कंटेनर ट्रेलर घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात उरण तालुक्यातील कीर्तनकार मंजुळा तांडेल (वय 54, रा. करळ) यांचा जागीच मृत्यू झाला असून 10 भाविक जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन महिलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
🔹 १८ वर्षांपासून सुरू असलेली अखंड दिंडी यात्रा
गेल्या 18 वर्षांपासून उरण तालुक्यातील जासई येथील शंकर मंदिरातून उरण ते आळंदी अशी पायी दिंडी काढली जाते. यंदाही 7 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. उरण, जासई, करळ, कामोठे, पारगाव आदी गावांतील सुमारे 150 भाविक यात सहभागी झाले होते. भक्तिभावाने कीर्तन, नामस्मरण आणि टाळमृदुंगांच्या निनादात ही दिंडी पुढे सरकत होती.
🔹 कामशेतजवळ अपघात — श्रद्धेचा प्रवास थांबला
11 नोव्हेंबरच्या रात्री दिंडीने कामशेत येथील काळभैरव मंदिरात मुक्काम केला होता. आज पहाटे सुमारे 5.45 वाजता दिंडी इंदुरीच्या दिशेने रवाना झाली असताना काही किलोमीटर अंतरावर मागून आलेल्या भरधाव कंटेनर ट्रेलरने दिंडीतील भाविकांना जोरदार धडक दिली. धडकेत कीर्तनकार मंजुळा तांडेल जागीच ठार झाल्या. या अपघातामुळे भाविकांमध्ये भीती आणि शोककळा पसरली.
🔹 कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी कंटेनर चालक चंद्रशेखर रमाकांत याच्याविरोधात कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अपघातग्रस्त भाविकांची विचारपूस सुरू असून जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
🙏 समाजमनात शोकाची लाट
कीर्तनकार मंजुळा तांडेल या उरण परिसरात त्यांच्या भक्तीमय कीर्तनांसाठी प्रसिद्ध होत्या. त्यांच्या अकस्मात निधनाने भाविकांमध्ये तसेच वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात निघालेली दिंडी आता दुःखाच्या अश्रूंनी ओलसर झाली आहे.