श्रीरामपूर / प्रतिनिधी:
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ नागपूर विभागाच्या वतीने हिंगणघाट (जि. वर्धा) येथील राखी राजेश राठोर हिचा सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्रात मराठी महासंघाकडून प्रथमच असा प्रेरणादायी उपक्रम राबविला गेला आहे. नागपूर विभागातून मराठी या विषयात सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या राखी राजेश राठोर हिचा सत्कार महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या राज्य कार्याध्यक्ष डॉ. मनीषा रिठे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी राखीच्या विषय शिक्षिका प्रा.विद्या खेळकर यांचाही सन्मान नागपूर विभागाचे मुख्य नियामक तथा नागपूर जिल्हा मार्गदर्शक प्रा. मनसाराम धाडसे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी हिंदी भाषिक असूनही मराठी विषयी गोडी व प्रेम असलेल्या राखी हिने अत्यंत भावपूर्ण शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.
उल्लेखनीय बाब म्हणजे मराठी सोबत सर्वच विषयात तिला प्रशंसनीय गुण आहेत. कला शाखेतून ९५.६७ गुण प्राप्त करणाऱ्या राखीला जिल्हाधिकारी होण्याची इच्छा आहे. घरातील परिस्थिती अत्यंत हलाखीची, वडील दिवसभर कुल्फ्या विकून कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. अशा आव्हानात्मक परिस्थितीत राखी हिचे कला शाखेतील विशेष प्राविण्य सर्वांना भारावून टाकणारे आहे. तिच्या उज्वल भविष्यासाठी महासंघाचे नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रा.सुरेश नखाते यांनी बोलके वास्तव मांडले.
तर मराठी महासंघाचे वर्धा जिल्हा प्रतिनिधी प्रा. गिरीश काळे यांनी समर्पक भाष्य करून आई-वडिलांना दिलासा दिला. भंडारा जिल्हा प्रतिनिधी प्रा. विनोद हटवार यांनी शुभेच्छा दिल्या. नागपूर जिल्हा सचिव प्रा.तिजारे यांनी काव्यपंक्ती सादर करून राखीच्या कार्याला प्रणाम केला.
नागपूर कार्याध्यक्ष प्रा.सपन नेहरोत्रा यांनी आपल्या कौतुकास्पद शब्दांनी राखीचे अभिनंदन केले. याशिवाय वर्धा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मृणाल काटोलकर, अरविंद राठोड, सेलू तालुका प्रतिनिधी प्रा. मंगेश वडुलकर यांनी मनोगत व्यक्त करून विभागातून मराठी विषयात प्रथम येणाऱ्या राखीवर अभिनंदनाचा वर्षाव केला.
राखी हिच्या गुणांची टक्केवारी बघता ती कला शाखेत राज्यातून प्रथम असावी असा अंदाज कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा. सुनील डिसले (बारामती) यांनी व्यक्त केला आहे.
वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट – श्रीरामपूर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर – 9561174111