शिर्डी | प्रतिनिधी
गणपती उत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच साकुरी शिव येथील साई पार्क सोसायटीमध्ये वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोटारसायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादात लाकडी दांडके, फायटर आणि लोखंडी रॉडचा वापर करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर जातीय स्वरूपाची शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 387/2026 दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम 189(2), 189(4), 191(2), 191(3), 190, 118(1), 115(2), 352 व 351(2) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा कलम 3(2)(va) व 3(1)(r) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
मोटारसायकलचा धक्का अन् वादाला हिंसक वळण
पोलिसांच्या नोंदीनुसार, 19 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 9 वाजता साई पार्क सोसायटीमध्ये गणपती मंडळासमोर खेळ व डान्सचे कार्यक्रम सुरू होते. यावेळी साहिल अकबर पठाण हा मोटारसायकलवरून वेगाने आल्याने प्रकाश कदम यांना धक्का लागल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याबाबत त्याला समजावून सांगत असताना वाद वाढला आणि परिस्थिती चिघळल्याचा आरोप आहे.
दांडके, फायटर, रॉड घेऊन मारहाण केल्याचा आरोप
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, साहिल अकबर पठाण, अकबर पठाण, सिद्धार्थ साळवे, अफसर पठाण, अबरार पठाण, आयान पठाण आणि त्यांच्यासोबत असलेल्या आणखी दोन व्यक्तींनी लाकडी दांडके, फायटर व लोखंडी रॉडने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या घटनेत दिपक हिरामन शिंदे, झुंबर हिरामन शिंदे आणि संदीप शिंदे जखमी झाल्याची नोंद पोलिस अहवालात आहे.
जातीय अपमानाचा गंभीर आरोप
या प्रकरणाला अधिक गंभीर वळण देणारा आरोप म्हणजे, फिर्यादी व साक्षीदार हे अनुसूचित जातीतील असल्याची माहिती असतानाही जातीय स्वरूपाची शिवीगाळ करण्यात आली, असा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच “आमच्या नादी लागले तर जीवे ठार मारून टाकू” अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 3(2)(va) व 3(1)(r) यांचाही गुन्ह्यात समावेश केला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक सरोदे आणि पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये अन्यथा ह्याच प्रमाणे कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी शांतता राखून पोलिसांना सहकार्य करावे. कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, असे कृत्य कोणीही करू नये. परिस्थिती बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी दिला.
साकुरी शिव परिसरात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
“पुन्हा असे प्रकार झाल्यास कडक कारवाई”
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. असे प्रकार पुन्हा घडल्यास कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साकुरी शिवमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस तपासात या प्रकरणातील आरोपांची सत्यता, प्रत्येक संशयिताची भूमिका आणि घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.