शिर्डी-राहाता हायवेवरील एक हजार रुमजवळील बद्रीमामा जनरल स्टोअर्स येथे पहिली धाड टाकण्यात आली.
पंचांसमक्ष झडती घेतली असता डायरेक्टर स्पेशल, आरएमडी, हिरा, रॉयल ७१७, विमल, व्ही-१, राजनिवास, रजनिगंधा, राजश्री आदी विविध प्रकारचा पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला.
याप्रकरणी बद्रीनाथ पंढरीनाथ लोखंडे (वय ५४) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त मालाची अंतिम किंमत FIR मधील अपूर्ण नोंदी पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
झडतीमध्ये सम्राट पानमसाला, विमल बिग पॅक, विमल किंग पॅक, हिरा महा पॅक, रॉयल ७१७ तंबाखू, डायरेक्टर स्पेशल, राजनिवास, जाफरानी जर्दा, च्युइंग तंबाखू यासह विविध प्रकारचा माल आढळून आला.
या कारवाईत ₹१ लाख ६१ हजार ९०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवशाही हॉटेलमध्येही प्रतिबंधित माल!
तिसऱ्या कारवाईत पालखी रोडवरील शिवशाही हॉटेल पोलिसांच्या रडारवर आले.
सावता माळी मंदिराजवळून पथक पंचांसह हॉटेलमध्ये पोहोचले. काऊंटरजवळ असलेल्या विनोद बाबुराव ठोंबरे (वय ५०) याची पंचांसमक्ष झडती घेतली असता हिरा पानमसाला, रॉयल ७१७ तंबाखू, डायरेक्टर स्पेशल पानमसाला, शॉट लक्झरी च्युइंग तंबाखू आणि विमल पानमसाला असा ₹४ हजार १५८ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन धाडींनी अनेक प्रश्न ऐरणीवर!
दुकानात माल, घराच्या पडवीत माल आणि हॉटेलच्या काऊंटरवरही प्रतिबंधित माल!
एकाच मोहिमेत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कारवाईमुळे शिर्डी परिसरातील प्रतिबंधित गुटखा विक्रीचे जाळे किती मोठे आहे, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आता केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता हा माल शिर्डीत येतो कुठून? पुरवठा कोण करतो? मोठ्या प्रमाणात माल कोणाकडून येतो? साठवणूक कुठे केली जाते? या प्रश्नांचा तपास होणे गरजेचे आहे.
‘पाठपुराव्याला यश’—आता पुढची कारवाई कधी?
दैनिक साईदर्शनने सातत्याने मांडलेल्या या प्रश्नाची प्रशासनाने दखल घेतल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मात्र ही कारवाई तीन ठिकाणांपुरतीच मर्यादित न राहता शिर्डी परिसरातील संपूर्ण अवैध गुटखा विक्रीच्या मुळापर्यंत पोहोचावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
शिर्डी शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात आणखी किती कारवाया होणार, तसेच पुरवठा साखळीतील मोठ्या व्यक्तींपर्यंत तपास पोहोचणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
एलसीबीचा स्पष्ट इशारा!
या सलग तीन कारवायांमधून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे—
“प्रतिबंधित गुटखा साठवाल, विक्री कराल किंवा त्याचा अवैध व्यवसाय कराल; पोलिसांची नजर चुकवणे आता सोपे नाही!”
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे राहुल कचरू डोके, विजय महादेव ठोंबरे, विरप्पा सिद्धप्पा करमल, अशोक हिरामण लिपणे, रणजित पोपट जाधव आणि अमृत शिवाजी आढाव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दैनिक साईदर्शनचा पाठपुरावा… प्रशासनाची कारवाई!
शिर्डीतील गुटखा विक्रीविरोधात आता कारवाईचा धडाका कायम राहणार का? याकडे साईनगरीचे लक्ष!
आरोपी व कारवाई करणारे पथक
गुन्ह्यातील आरोपी :
१) गुन्हा क्र. ७४३/२०२६ – शिर्डी पोलीस ठाणे
विनोद बाबुराव ठोंबरे (वय ५०, रा. नांदुर्खी रोड, शिर्डी)
फरार : हबीब उर्फ सोहेल अन्सारी (रा. शिर्डी)
२) गुन्हा क्र. ७४४/२०२६ – शिर्डी पोलीस ठाणे
बद्रीनाथ पंढरीनाथ लोखंडे (वय ५४, रा. शिर्डी)
फरार : अलीम शेख (पूर्ण नाव माहित नाही), कलीम शेख (पूर्ण नाव माहित नाही), दोघेही रा. शिर्डी.
३) गुन्हा क्र. ७४५/२०२६ – शिर्डी पोलीस ठाणे
फरार : बंटी लहामगे (पूर्ण नाव माहित नाही, रा. राहाता), अमोल जाधव (पूर्ण नाव माहित नाही, रा. मुंढेकरवाडी, ता. श्रीगोंदा).
कारवाई करणारे पथक
पोलीस निरीक्षक : संतोष मुटकुळे
पोलीस अंमलदार : विजय ठोंबरे, बिरप्पा करमल, अशोक लिपणे, राहुल डोके, रणजीत जाधव, अमृत आढाव.
मार्गदर्शन : पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.