शिर्डी | प्रतिनिधी :
शिर्डी शहरालगत नगर–मनमाड रोडवरील एका बिअर शॉपीमध्ये पुन्हा एकदा हाणामारी झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. किरकोळ वादाचे पर्यवसान थेट मारामारीत झाले असून, एका तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत तरुण रक्तबंबाळ झाल्याचे समजते. जखमी तरुणाला वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, या घटनेबाबत बातमी लिहिताना उपलब्ध माहितीनुसार अद्याप शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वीही असाच प्रकार; पोलिसांची कारवाई केवळ हाकलण्यापुरती?
काही दिवसांपूर्वी भारत मते यांच्या बी.एम. शॉपी येथेही अशाच प्रकारे मारामारीची घटना घडली होती. त्या प्रकरणात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी दोन वेळा संबंधित बिअर शॉपी परिसरात जाऊन तेथे बिअर पिणाऱ्या व्यक्तींना हाकलून दिल्याची माहिती आहे.
मात्र, त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला दिसत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. पोलिसांची कारवाई होते, काही काळ गर्दी हटते आणि पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर येते, असा प्रकार सुरू असल्याची चर्चा परिसरात आहे.
‘पार्सल’चा नियम कागदावरच? शॉपीतच मद्यपान
बिअर शॉपीच्या नियमांनुसार बिअर विक्री करून ती पार्सल स्वरूपात देणे अपेक्षित आहे. दुकानाच्या परिसरात बसून मद्यपान करण्यास परवानगी नसते. असे असतानाही संबंधित परिसरात बिअर खरेदी करून त्याच ठिकाणी मद्यपान केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
यामुळे मद्यपींची गर्दी, वादावादी आणि त्यानंतर थेट हाणामारीच्या घटना घडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कालच्या घटनेत तर चक्क बिअरची बाटली डोक्यात फोडण्यात आल्याने या प्रकाराचे गांभीर्य समोर आले आहे.
बिअर शॉपी की मारामारीचा अड्डा? पोलिसांनी कायमस्वरूपी कारवाई करावी
नगर–मनमाड रोडवरील या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार हाणामारी होत असेल, तर संबंधित ठिकाणी नियमांचे पालन होते की नाही, याची प्रशासनाने गांभीर्याने तपासणी करण्याची गरज आहे.
फक्त घटना घडल्यानंतर घटनास्थळी जाऊन मद्यपान करणाऱ्यांना हाकलून देण्यापेक्षा नियमांचा भंग करणाऱ्यांवर आणि नियमभंगास कारणीभूत ठरणाऱ्या प्रकारांवर कायमस्वरूपी कारवाई होणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, कालच्या घटनेतील जखमी तरुणाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पोलीस प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि गुन्हा दाखल होतो का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
खून झाल्यावरच पोलीस प्रशासन जागे होणार का?
नगर–मनमाड रोडवरील संबंधित बिअर शॉपीवर यापूर्वीही अनेकदा वाद, हाणामारी आणि मारामारीचे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आता पुन्हा एका तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडण्यात आली आहे. एखादा जीव गेल्यानंतरच पोलीस प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
वारंवार घडणाऱ्या घटनांची गांभीर्याने दखल घेत शिर्डी पोलिसांनी दारूबंदी विभागाला अधिकृत पत्र देऊन संबंधित शॉपीमधील नियमांचे उल्लंघन, अनधिकृत मद्यपान तसेच यापूर्वीच्या घटनांची माहिती देत परवाना धारकावर नियमानुसार कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कारवाईच्या नावाखाली केवळ हाकलून देण्यापेक्षा कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना कधी? हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.
आर्थिक ‘अर्थ’पूर्ण संबंधांमुळे कारवाईकडे दुर्लक्ष?
दारूबंदी विभागाच्या कारवाईवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने मद्यपान सुरू असल्याच्या तक्रारी व घटना समोर येत असतानाही दारूबंदी विभागाकडून ठोस कारवाई का होत नाही? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. कारवाई होत नसण्यामागे आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चा आणि आरोप परिसरात सुरू असून, या आरोपांची संबंधित विभागाने निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी होत आहे.