शिर्डी | प्रतिनिधी
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाश आणि आपुलकीचा सण! मात्र आपल्या आनंदात समाजातील गरजू आणि अनाथ चिमुकल्यांनाही सहभागी करून घेतले, तर दिवाळीचा खरा आनंद द्विगुणित होतो. याच माणुसकीच्या भावनेतून कलकत्ता (पश्चिम बंगाल) येथील साईबाबांचे निस्सीम भक्त संजय दुगर यांनी शिर्डी येथील साई आश्रया अनाथालयातील चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी करत सामाजिक बांधिलकीचे सुंदर उदाहरण घालून दिले.

शिर्डी येथील ज्येष्ठ शिवसैनिक अनिल पवार पाटील यांचे बंगालमधील मित्र असलेले संजय दुगर हे साईबाबांचे निस्सीम भक्त आहेत. दिवाळीच्या सणात अनाथालयातील मुलांनाही आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे आणि त्यांनाही सणाचा उत्साह अनुभवता यावा, या उद्देशाने त्यांनी विशेष पुढाकार घेतला.
यावेळी साई आश्रया अनाथालयातील चिमुकल्यांना फटाक्यांचे वाटप करण्यात आले. एवढेच नव्हे, तर मुलांसाठी खास डॉमिनोज पिझ्झा आणि आईस्क्रीमची मेजवानी आयोजित करण्यात आली होती. अचानक मिळालेल्या या आनंददायी भेटीमुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मुलांसोबत हसत-खेळत आणि त्यांचा आनंद द्विगुणित करत संजय दुगर यांनी दिवाळीचा खरा अर्थ कृतीतून दाखवून दिला.
या प्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक अनिल पवार पाटील, अनिल कोते, प्रसाद जपे, बाबासाहेब जाधव आणि महेश नागरे उपस्थित होते.
दिवाळीच्या दिव्यांचा प्रकाश घराघरांत पोहोचतो; मात्र एखाद्या अनाथ चिमुकल्याच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य हेच खऱ्या दिवाळीचे समाधान असते. संजय दुगर यांनी आपल्या कृतीतून माणुसकीचा हाच प्रकाश शिर्डीत पसरविला.